शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप

By निशांत वानखेडे | Published: January 16, 2024 06:45 PM2024-01-16T18:45:44+5:302024-01-16T18:46:54+5:30

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला.

Govt's Marathi language fortnight is limited to Pune, Mumbai, Shripad Joshi's allegation | शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप

शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप

नागपूर : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने १४ जानेवारीपासून मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त जाहीर केलेला ‘साहित्य सेतू’ उपक्रम पुणे, मुंबईपुरता मर्यादित आहे का, असा सवाल अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. अशा प्रकारामुळे राज्यातील इतर विभागांत विलगतेची भावना निर्माण हाेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला. याबाबत मराठी भाषा विभागाला तसेच मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, विश्वकोश मंडळाचे सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ही खंत व्यक्त केली. हा प्रश्न महाराष्ट्रातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही संबंधितांना पडत असतो, हे लक्षात ठेवणे हेदेखील शासनाचेच काम व हे पुन:पुन्हा शासनाच्या लक्षात आणून द्यावे लागते, हे मराठीचे दुर्दैव आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, वेगळ्या राज्याचे नव्हे, याचे स्मरण शासनाला करून द्यावी लागते, ही खंत आहे. अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सहभागी करण्याचे धोरण शासनाने राबवायला हवे. अशा कार्यपद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जाते आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्याला देखील बाधा पोहोचते, हेदेखील डॉ. जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्रातील इतर विभागांतदेखील मान्यवर लेखक, प्रतिभा, विद्वत्ता आहे, याचे भान शासनाने राखले पाहिजे, असेही या पत्रात डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.

Web Title: Govt's Marathi language fortnight is limited to Pune, Mumbai, Shripad Joshi's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर