गोवर-रुबेला : नागपुरात ३ लाख ७६ हजार मुलांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:00 PM2018-12-06T23:00:44+5:302018-12-06T23:02:32+5:30
गोवर-रुबेला लसीकरणात गेल्या सहा दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार बालकांना लस देण्यात आली. दिवसेंदिवस या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र शहरात अजूनही काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गैरसमज आहे. यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी अशा शाळांच्या मुख्यध्यापिका, नोडल अधिकारी, पालक संघटनेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोवर-रुबेला लसीकरणात गेल्या सहा दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार बालकांना लस देण्यात आली. दिवसेंदिवस या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र शहरात अजूनही काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गैरसमज आहे. यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी अशा शाळांच्या मुख्यध्यापिका, नोडल अधिकारी, पालक संघटनेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
शहरात आतापर्यंत १ लाख ८५ हजार मुलांना लस देण्यात आली तर नागपूर ग्रामीणमध्ये १ लाख ९१ हजार मुलांना लस देण्यात आली. लसीकरणावर लोकांचा विश्वास वाढत असल्याने विद्यार्थ्यांचा आकडाही वाढत चालला आहे. प्राप्त माहितीनुसार, शहरात दहा झोनपैकी पहिल्या चार झोनमधील शाळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक शाळांमध्ये १०० टक्के लसीकरणही झाले आहे. मात्र पाच ते दहा झोनमध्ये अनेक शाळांमध्ये अद्यापही लसीकरण झालेले नाही. काही शाळांमध्ये मोजकेच विद्यार्थी लसीकरणासाठी समोर आले आहे. यामुळे जिथे प्रतिसाद नाही तेथील लसीकरण थांबवून ठेवण्यात आले आहे. अफवा आणि गैरसमज कसे दूर करता येईल यावर प्रशासन तोडगा काढण्याचा प्रयत्नात आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवार ७ डिसेंबर रोजी मनपा आयुक्तांनी अशा सर्व शाळांचे मुख्याध्यापक, लसीकरणाचे नोडल अधिकारी, शाळांमधील पालक संघटना, मनपाचे अधिकारी यांची बैठक बोलावली आहे. यात काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.