गोवारी समाजाने निवडणुकीतून एकजुटता दाखवावी :प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 11:21 AM2021-12-27T11:21:40+5:302021-12-27T11:38:06+5:30
गोवारी समाजाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीतून एकजुटता दाखवावी व आपला प्रतिनिधी विधीमंडळात पाठवावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते ‘अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय भव्य मेळाव्या’त मार्गदर्शन करीत होते.
नागपूर : आपल्या समाजाचे प्रतिनिधीच आपले प्रश्न सोडवू शकतात. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्या समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे गोवारी समाजाने त्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीतून एकजुटता दाखवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
‘अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय भव्य मेळावा’ पासपोर्ट कार्यालयाजवळ न्यू मानकापूर येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ॲड. आंबेडकर म्हणाले, गोवारी समाजाने आपल्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. लाखोंचा मोर्चा काढला. याच नागपुरात काढलेल्या मोर्चात शेकडो समाजबांधव शहीद झाले. या घटनेची तीव्रता लक्षात यावी म्हणून मखराम पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु, सरकारने तेव्हा त्या घटनेची पाहिजे तशी दखल घेतली नव्हती.
माना समाजाचाही तोच विषय होता. परंतु, त्यांचा प्रश्न मार्गी लागला. गोवारी समाजाचा का नाही? कारण माना समाजाने सामूहिकपणे निर्णय घेतला. आपला प्रतिनिधी निवडून दिला. गोवारी समाजानेही तसाच सामूहिक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार रमेश गजबे, अखिल भारतीय आदिवासी गोवारी शक्ती संघाचे अध्यक्ष भगवान भोंडे, रवी शेंडे, राजू लोखंडे, राहुल वानखेडे, विलास वाटकर, कुशल मेश्राम, विवेक हाडके, प्रफुल्ल मानके, राहुल दहीकर प्रामुख्याने उपस्थित होते.