शहीद गोवारी स्मारकावर संतापलेल्या मनाने वाहिली वेदनांची फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 09:17 PM2017-11-23T21:17:34+5:302017-11-23T21:27:38+5:30
विदर्भातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो गोवारी बांधवांनी गोवारी शहीद स्मारकावर श्रद्धांजली अर्पण केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : २३ नोव्हेंबर १९९४ चा तो प्रसंग आजही गोवारी बांधवांच्या अंगावर शहारे आणतो. गोवारी शहीद स्मृतिदिनाला स्मारकावर संतापलेल्या मनाने हे बांधव आपल्या आप्तस्वकीयांना श्रद्धांजली अर्पण करतात, तेव्हा त्यांच्या वेदना अश्रूरूपाने बाहेर पडतात. एका ‘कॉमा’ साठी ११४ गोवारी बांधवांचे रक्त सांडल्यानंतरही २३ वर्षानंतरही जो न्याय त्यांना अपेक्षित आहे, तो मिळाला नाही. ही खंत, चीड, गुरुवारी स्मारकावर आलेल्या गोवारी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसून आली. संतापलेल्या मनाने या बांधवांनी वेदनांची फुले शहिदांना अर्पण केली.
गोंड व गोवारी यांच्यामध्ये कॉमा लावून गोवारींना अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याच्या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी हजारो गोवारी बांधवांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मात्र सायंकाळ होता होता मोर्चात सहभागी शेकडो बांधवांचे कुटुंबीय बेचिराख झाले. अचानक उद्भवलेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधवांनी प्राण गमावला आणि शेकडो जायबंदी झाले. या घटनेला २३ वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत हा समाज आजही लढा देतो आहे. या काळ्या स्मृतींच्या आठवणीत दरवर्षी गोवारी समाज नागपुरातील गोवारी शहीद स्मारकावर एकवटतो. गुरुवारी विदर्भातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो बांधवांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्यांनी चेंगराचेंगरीत आपले आप्त गमावले त्यांना हुंदका आवरणे कठीण झाले होते. अनेक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही येथे श्रद्धांजली अर्पण केली. आदिवासी गोवारींच्या परंपरागत वाद्यासह काही संघटनांनी रॅली काढली. यात मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थ्यांचा समावेश होता. ‘गोवारी शहिदांचा विजय असो, गोवारी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे...’ या घोषणांनी हा परिसर निनादला होता.