जि.प. उमेदवारांना करावा लागणार 'ऑनलाईन' अर्ज : जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:11 AM2019-11-21T00:11:50+5:302019-11-21T00:14:04+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या नंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे.

GP Candidates have to apply 'online application': Collector Thackeray | जि.प. उमेदवारांना करावा लागणार 'ऑनलाईन' अर्ज : जिल्हाधिकारी ठाकरे

जि.प. उमेदवारांना करावा लागणार 'ऑनलाईन' अर्ज : जिल्हाधिकारी ठाकरे

Next
ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्जाची प्रिंट करावी लागणार सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचा होता. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या नंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प.निवडणूक अधिकारी अविनाश कातडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयोगाच्यावतीने अर्ज भरण्यासाठी एक लिंक देण्यात येणार आहे. यावर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सादर करावी लागणार आहे. अर्ज भरण्याकरिता आवश्यक सर्व यंत्रणा तहसील कार्यालयात उभी करण्यात येईल. अनामत रक्कमही ऑनलाईन भरावी लागणार लागेल. सर्वसाधारण प्रवगार्साठी १ हजार तर आरक्षित वर्गासाठी ५०० रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे. पंचायत समितीकरिता ही ७०० व मागासवर्गीयांसाठी ३५० रुपये इतकी आहे.

१४ लाख १९ हजार मतदार, १८१४ मतदान केंद्र
जिल्हा परिषदेच्या ५८ व पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत १४ लाख १९ हजार ७१७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. यात ६ लाख ८९ हजार ६१५ महिला व ७ लाख ३० हजार ९१ पुरुष मतदार आहेत. तसेच ११ तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५८ सर्कल करिता १८१४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मतदानासाठी ईव्हीएम मशीन राहील परंतु व्हीव्हीपॅट राहणार नाही. त्याऐवजी आवश्यक मेमरी चीप राहील. निवडणुकीसाठी २०१२ सीयू व ४०२४ बीयू तर २०१२ मेमरी चीप उपलब्ध आहे.

निवडणुकीत खर्च करता येईल तीन लाख
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ३ लाख रुपये तर पंचायत समितीकरिता उमेदवाराला दोन लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे.
तब्बल पावणेआठ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या ५८ तर पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. एका जिल्हा परिषद सर्कलमध्ये २० ते २५ गावांचा समावेश आहे. काही सर्कलमध्ये ३० ते ३३ गावांचा समावेश आहे. एका जि.प. सर्कलमध्ये दोन पंचायत समितीचा समावेश असतो. त्यामुळे पंचायत समितीत जि.प.च्या निम्मी गावे येतात. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला मोठी कसरत करावी लागते. जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवाराला ३ लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. तर पंचायत समितीच्या उमेदवाराला २ लाख रुपयापर्यंत खर्च करता येईल. यापेक्षा जास्त पैसे खर्च करणाऱ्या उमेदवाराच्या निवडणुकीवर प्रतिबंध घालण्यात येणार असून विजयी झाल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, उमेदवाराला निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार असून सर्व खर्च याच खात्याच्या माध्यमातून करावे लागणार आहे.

Web Title: GP Candidates have to apply 'online application': Collector Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.