पथदिव्यांचे वीज बिल भरण्यास ग्रा.पं.चा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:57+5:302021-07-02T04:07:57+5:30
नरखेड : राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे वीज बिल पंधराव्या वित्त आयोगातून भरण्यास ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी विरोध दर्शविला आहे. लाखोची देयके ...
नरखेड : राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे वीज बिल पंधराव्या वित्त आयोगातून भरण्यास ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी विरोध दर्शविला आहे. लाखोची देयके भरल्यास ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे करण्यास निधी शिल्लक राहणार नसल्याने शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सेवा महासंघाने दिलेल्या निवेदनात दिला आहे.
पथदिव्यांची देयके थकल्याने महावितरण कंपनीने ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गावातील सरपचांनी तक्रारी केल्याने सरपंच सेवा महासंघाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेपासून मंत्रालयापर्यंत निवेदन देऊन अडचणी मांडल्या. शासनाने ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल पंधराव्या वित्त आयोगातून खर्च करण्याचे आदेश दिले. मात्र विकास कामांना निधी राहणार नाही. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आरोग्यविषयक स्वच्छतेची कामे करावी लागतात. यासाठी शासनाने ही मागणी मान्य करावी नाही तर राज्यभर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष प्रांजल राजेश वाघ, सरचिटणीस मनीष फुके, सचिव महेश कलारे, योगिता गायकवाड, रूपेश मुंदाफळे, गणेश नाकाडे, बबनराव करडभाजने, सुधीर गोतमारे, आरती शहाणे, उज्ज्वला पाटील, विकास भोयर, अमोल फुके यांनी दिला आहे.