ढगाआडही मृत्यूचे उदासभान शोधत असतील ग्रेस!

By admin | Published: March 26, 2017 01:56 AM2017-03-26T01:56:32+5:302017-03-26T01:56:32+5:30

२६ मार्च २०१२. आजचाच दिवस. शब्दाआड दडलेल्या संध्यामग्न प्रतिमा शोधता शोधता अचानक आत्मरूपाचा शोध लागला आणि ग्रेस शांत झाले.

Grace may be looking for sadness of death! | ढगाआडही मृत्यूचे उदासभान शोधत असतील ग्रेस!

ढगाआडही मृत्यूचे उदासभान शोधत असतील ग्रेस!

Next

आज स्मृतिदिन
शफी पठाण नागपूर
२६ मार्च २०१२. आजचाच दिवस. शब्दाआड दडलेल्या संध्यामग्न प्रतिमा शोधता शोधता अचानक आत्मरूपाचा शोध लागला आणि ग्रेस शांत झाले. शब्दाच्या मायेने हळव्या झालेल्या खडकाच्याही डोळ्यात पाणी उभे करणाऱ्या त्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. स्वभावानुसार मृत्यूलाही धाप लागेपर्यंत झुंजविल्यानंतर स्वत:च त्याच्या हवाली होताना आता अंतर्मनाला अस्वस्थ करणारी शब्दकळा आपल्याला छळणार नाही, असा ग्रेसांचा समज झाला असेल तर तो निव्वळ भ्रम आहे ‘मृगजळाच्या बांधकामा’सारखा. याला कारण, ग्रेस आणि शब्दांचे नातेच मुळी खोल आहे प्राचीन नदीसारखे. अन् ते असे क्षणिक तृप्ततेला भुलून आपला प्रवाह बदलणे शक्यच नाही. म्हणूनच ग्रेस आजही जिवंत आहेत एक दंतकथा बनून. अंतर्मनाच्या उत्खननातून हाती सलग येत राहिलेले अनंत अवशेष शब्दांच्या सर्वांगात पेरून हा औलिया वाजवत राहिला खिन्नतेची बासरी. अगदी समोर मृत्यू उभा असतानाही. अखेर ग्रेसांनाच मृत्यूची दया आली आणि ते निघाले त्याच्यासह अनंताच्या प्रवासाला. आपल्याला मृत्यूचे उदासभान शोधायचे आहे आणि ते ढगाआड गेल्याशिवाय शोधता येणार नाही, असेच कदाचित गे्रसांना वाटले असेल. नेमके काय झाले माहीत नाही, पण २६ मार्च २०१२ रोजी ग्रेसनामक कवितेच्या या प्रज्वलित दीपांजलीवर काळाने त्याच्या धर्मकर्तव्यानुसार फुंकर घातली आणि लौकिकार्थाने ती विझली. लोक म्हणाले, गेस गेले. पण, या म्हणण्याला खरे कसे मानावे? कारण, आजही जेव्हा कुणी ‘मितवा’ची पाने उलटतो, ‘चर्चबेल’च्या शब्दांना ओंजळीत धरतो, ‘चंद्रमाधवीच्या प्रदेशा’त शतपावली करतो, ‘ओल्या वाळूंच्या बासरी’ला ओठाशी धरतो...तेव्हा प्रत्येक वेळेस ग्रेस नावाचे हे अविट गाणे वाचकांच्या मनात फेर धरत असते सांध्यपर्वतावरील असंख्य वैष्णवांसह. दूर वाऱ्याने हलणाऱ्या धुक्यांच्या खोल तळाशी एक दुर्बोध शिल्प दिसत असते काहीशे अस्पष्ट. ते ग्रेसच असतात.
सांजभयाने अस्वस्थ झालेल्या वाचकाला आपल्या सनातन शब्दसामर्थ्याने आश्वस्त करण्यासाठी व अंतर्मुखता, आत्ममग्नता आणि आत्मप्रीतीचे आरोप झेलणाऱ्या आपल्या कवितेला सहनशीलतेची रसद पुरवण्यासाठी ग्रेसांची पडछाया अशी डोकावत असते पुस्तकांच्या पानापानातून. मग कसे म्हणायचे ग्रेस गेले? आजही धंतोलीच्या वीणा विहारमधून अननसाचा रस पिऊन, खांद्यावर शबनम बॅग लटकवून अंबाझरी मार्गावरील स्वीमिंग टँककडे झेपावणारी पावले ग्रेसांचीच आहेत, असा भास होतो तेव्हा मन पुन्हा विचारते, मग कसे म्हणायचे ग्रेस गेले?

Web Title: Grace may be looking for sadness of death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.