‘अ’ श्रेणीचा दर्जा हवाच
By admin | Published: August 28, 2015 03:10 AM2015-08-28T03:10:25+5:302015-08-28T03:10:25+5:30
पात्रतेचा सर्व अटी पूर्ण करूनही दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आलेला नाही.
संघटनांचा वाढता दबाव : शासनाने दखल घ्यावी
नागपूर : पात्रतेचा सर्व अटी पूर्ण करूनही दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आलेला नाही. तेव्हा दीक्षाभूमीच्या सन्मानासाठी दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात लोकमतने पुढाकार घेतला आहे. लोकमतच्या या पुढाकारास आंबेडकरी जनतेसह विविध संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज विविध संघटनांतर्फे यासंदर्भात मागणी केली जात आहे.
संवेदनशीलता दाखवावी
मानवाला हजारो वर्षांच्या धार्मिक गुलामगिरीतून तथा शोषणातून मुक्त करून, त्याला समानतेचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या दीक्षाभूमीला अ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करा, अशी मराठा सेवा संघातर्फे आम्ही मागणी करीत आहोत. जगातून सर्वच ठिकाणावरून अनेक लोक दीक्षाभूमीवर येऊन समानता व मानवतेचा संदेश घेऊन जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीवरून सर्व जगाला धम्मचक्रक्रांतीचा प्रकाश दिला.
जागतिक महत्त्व लक्षात घ्यावे
दीक्षाभूमीचे महत्त्व हे देशापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते जागतिक बौद्धांचे केंद्र बनले आहे. दीक्षाभूमीचे हे जागतिक महत्त्व लक्षात घेण्याची गरज आहे. दीक्षाभूमीला कुठल्याही श्रेणीत बसवता येणार नाही, मात्र शासन दरबारी त्याची श्रेणी ठरवली जात असेल तर ती ‘अ’ श्रेणीचीच असायला हवी. तेव्हा यासंदर्भात शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा व ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा.
नरेश वाहाणे, अध्यक्ष, रिपब्लिकन मुव्हमेंट
‘अ’ श्रेणीच हवी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र दीक्षाभूमीवर ऐतिहासिक धम्मक्रांती घडवली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी जागतिक कीर्तीचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचाच दर्जा हवा. आजपर्यंतच्या सरकारने जे काम केले नाही ते सध्याच्या सरकारने केले, त्याचे स्वागत आहेच. परंतु दीक्षाभूमीचे एकूण महत्त्व लक्षात घेऊन राज्य सराकरने दीक्षाभूमीला अ श्रेणीचाच दर्जा द्यायला हवा. तेव्हा शासनाने यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा.
प्रकाश रामटेके, केंद्रीय अध्यक्ष - दलित पँथर
भारतातीलच नव्हे तर जगाच्या विविध प्रांतामधील दलित समाजाला मानवतेच्या पातळीवर आणण्याचे कार्य याच भूमीवर झाले. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करावे. सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीला सुद्धा अ श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन त्याचा सुद्धा विकास सरकारने करावा.
-विजयकुमार शिंदे, मराठा सेवा संघ