पदवीधर मतदार संघ निवडणूक : शेवटच्या तासात करतील कोरोनाग्रस्त मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 10:14 PM2020-11-05T22:14:53+5:302020-11-05T22:17:03+5:30
In Graduate Constituency Elections Coronated Voting in the Last Hour विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कोरोनाग्रस्तांनाही मतदानाचा अधिकार बजावता येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कोरोनाग्रस्तांनाही मतदानाचा अधिकार बजावता येईल. मतदानाच्या शेवटच्या एका तासात मतदान केंद्रावर जाऊन ते मताधिकाराचा उपयोग करू शकतील. पोस्टल बॅलेट पेपरने मतदान करण्याची सुविधा त्याच कोरोना रुग्णाला दिली जाईल, जो रुग्णालयात दाखल असेल.
जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले की निवडणुकीत मास्क, ग्लोव्हज, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. त्यांनी सांगितले, निवडणुकीसाठी जिल्ह्यात १३९ मतदान केंद्र बनवण्यात आले आहे. राजकीय पक्ष १० नोव्हेंबरपासून सूचना व आक्षेप घेऊन शकतील. निवडणुकीचे संचालन विधानसभा निवडणुकीप्रमाणे केले जाईल. बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हाधिकारी हेमा बढे व सुजाता गंधे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवासकर,काँग्रेसचे प्रशांत पाटील, भाजपचे रमेश दलाल उपस्थित होते.
जिल्हाधिकारी ठाकरे यांनी उमेदवार व पक्षांना आचारसंहितेचे कठोरतेने पालन करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, ८० वर्षापेक्षा अधिक वयाच्या मतदारालाा पोस्टल बॅलेट पेपरची सुविधा दिली जाईल. उमेदवारी अर्ज सादर करताना केवळ दोन व्यक्तीलाच प्रवेश दिला जाईल. प्रचारात पाच लोक सहभागी होऊ शकतील. जास्तीत जास्त पाच वाहनांचा वापर करता येईल.
पेनावरही बंदी
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मतदान केंद्रात मतदारास पेन सुद्धा नेता येणार नाही. मतदारांना उमेदवाराची प्रथम पसंती सांगावी लागेल. अन्यथा त्यांचे मत अमान्य होईल. प्रत्येक मतदान केंद्राची व्हिडीओग्राफी केली जाईल.
आचारसंहितेसाठी कक्ष सुरु
आचारसंहितेशी संबंधित तक्रारीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात कक्ष सुरु करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी ही माहिती देत मिलिंद साळवे यांना या कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील यांनाही कक्षात तैनात करण्यात आले आहे.