पदवीला ‘सेमिस्टर’ प्रणाली
By admin | Published: March 17, 2016 03:26 AM2016-03-17T03:26:57+5:302016-03-17T03:26:57+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पुढील सत्रापासून परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्याचा विचार सुरू आहे.
नागपूर विद्यापीठ : पुढील सत्रापासून अंमलबजावणीचा मानस
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पुढील सत्रापासून परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्याचा विचार सुरू आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम व ‘बीएस्सी’प्रमाणे ‘बीए’, ‘बीकॉम’ यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांनादेखील ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने आराखडा तयार केला असून यावर लवकरच अंतिम मोहोर लागण्याची शक्यता आहे.
नागपूर विद्यापीठाने २०१२ साली पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘क्रेडिट बेस सिस्टीम’सोबतच ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू केली. पदवी अभ्यासक्रमांना ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू करण्यात यावी, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाने अगोदरच केली होती. परंतु नागपूर विद्यापीठात याची अंमलबजावणी झाली नव्हती. केवळ ‘बीएसस्सी’ला ही प्रणाली लागू करण्यात आली. परंतु विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रशासनाने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. कला, वाणिज्य, समाजविज्ञान शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.
याबाबत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.दिनेशकुमार अग्रवाल यांची बैठकदेखील झाली. अधिकाऱ्यांनी याचा प्राथमिक आराखडादेखील तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत प्र-कुलगुरू डॉ.येवले यांना विचारणा केली असता त्यांनी या घडामोडीस होकार दिला. विद्यापीठाचा दर्जा वाढला पाहिजे. शिवाय विद्यार्थ्यांनादेखील सुटसुटीतपणे परीक्षा देता आली पाहिजे. यासाठीच आमचा हा विचार सुरू असून पुढील शैक्षणिक सत्रापासून प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पदवी अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर महाविद्यालयांतील शिक्षकांची प्रचंड धावपळ होणार आहे. ‘सेमिस्टर’चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, शिवाय विविध प्रात्यक्षिके ही कामे तर त्यांना करावी लागणार आहेच.
शिवाय महाविद्यालयांतील प्रशासकीय कामे, संशोधन, परिषदा, पेपर सादरीकरण यावरदेखील लक्ष देणे गरजेचे राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीदेखील तारेवरची कसरत होणार आहे. (प्रतिनिधी)