नागपुरात रेशन दुकानदारांनी बंद केले धान्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:13 PM2020-08-08T22:13:58+5:302020-08-08T22:15:53+5:30

शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे.

Grain distribution stopped by ration shopkeepers in Nagpur | नागपुरात रेशन दुकानदारांनी बंद केले धान्य वितरण

नागपुरात रेशन दुकानदारांनी बंद केले धान्य वितरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे. शहरातील स्वस्त धान्य दुकानातून ७ ऑगस्टपासून या महिन्याचे धान्य वितरण करायचे होते. यासाठी प्रशासनाद्वारे ई-पॉश मशीनही सुरू करण्यात आली आहे. या बॉयोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करीत कार्ड धारकांना धान्य वितरण करण्याचे निर्देश रेशन दुकानदारांना देण्यात आले होते. याच गोष्टीमुळे दुकानदारांनी धान्य वितरण करण्यास नकार दिला. ई-पॉश मशीनवर कार्डधारकांचा अंगठा घेण्याच्या प्रक्रियेने धान्य वितरण करण्यास नागपूर रेशन दुकानदार संघाने जाहीरपणे नकार दिला. अंगठा लावण्याच्या प्रक्रियेमुळे कार्डधारक आणि दुकानदारांना कोविड १९ चे संक्रमण होण्याचा धोका संघटनेने व्यक्त केला.
प्राप्त माहितीनुसार कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या कारणाने सरकारने मार्च ते ३१ जुलै २०२० पर्यंत रेशन केंद्रावर धान्य वितरणासाठी कार्डधारकांऐवजी दुकानदारांनी अंगठे लावण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही. मात्र १ ऑगस्टपासून पुन्हा कार्डधारकांचे अंगठे लावणे आवश्यक करण्यात आले. यावर दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. राज्यात कोविड-१९ चा फैलाव वेगाने होत आहे. नागपूर शहरातही परिस्थिती विपरीत होत असून दररोज अनेक लोक संक्रमित होत आहेत. अशावेळी कार्डधारकांचे अंगठे ई-पॉश बॉयोमेट्रिक मशीनला लावून धान्य वितरण करणे घातक ठरू शकते, अशी भीती दुकानदारांनी व्यक्त केली. यामुळे कोविडचे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा नियमही प्रभावित होणार असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. अंगठा लावण्याची प्रक्रिया रद्द करा, अन्यथा धान्य वितरण करणार नाही, असा इशारा दुकानदार संघटनेने दिला आहे.

शहरात दोन दुकानदार संक्रमित
रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उमाशंकर अग्रवाल यांनी सांगितले, अनेकदा ग्राहकांचा हात पकडून अंगठा लावावा लागतो. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण होते. त्यामुळे कोविडचे संक्रमण पसरण्याची शक्यता असते. सरकारने दुकानदारांना कोविडसाठी विम्याचे संरक्षण दिलेले नाही. कुठलीही सुरक्षेची सुविधाही उपलब्ध नाही. अशावेळी जीव धोक्यात घालून धान्य वितरण करावे लागते. कार्डधारकांचा अंगठा घेऊन आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. दररोज कोविड-१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. शांतिनगर आणि डागा ले-आऊट येथील दोन दुकानदार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारने ग्राहकांचा अंगठा घेण्याऐवजी दुकानदारांचेच अंगठे लावण्याची प्रक्रिया पूर्ववत करावी, अन्यथा धान्य वितरण करणार नाही, असा इशारा अग्रवाल यांनी दिला.

Web Title: Grain distribution stopped by ration shopkeepers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.