आदिवासी विकास महामंडळाच्या गाेदामातून धानाची पाेती गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 08:34 AM2021-10-14T08:34:00+5:302021-10-14T08:35:02+5:30

Nagpur News रामटेक येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून खरेदी केलेली धानाची पाेती महादुला, ता. रामटेक येथील वेअर हाऊसमध्ये साठवून ठेवली हाेती. या पाेत्यांची तपासणी केली असता, त्यातील १५१९.७६ क्विंटल धान कमी आढळून आला आहे.

Grain field disappears from Gada of Tribal Development Corporation | आदिवासी विकास महामंडळाच्या गाेदामातून धानाची पाेती गायब

आदिवासी विकास महामंडळाच्या गाेदामातून धानाची पाेती गायब

Next
ठळक मुद्देतीन काेटी रुपयांचे धानचोरी की अफरातफर याबाबत चौकशी सुरू

राहुल पेटकर

नागपूर : आदिवासी विकास महामंडळाने भंडारबोडी, रा. रामटेक येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून खरेदी केलेली धानाची पाेती महादुला, ता. रामटेक येथील किरायाने घेतलेल्या शिवपार्वती वेअर हाऊसमध्ये साठवून ठेवली हाेती. या पाेत्यांची तपासणी केली असता, त्यातील १५१९.७६ क्विंटल धान कमी आढळून आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा धान बेर्डेपार, ता. रामटेक येथील केंद्रावर खरेदी करण्यात आला हाेता. धानाच्या पाेत्यांची अफरातफर करण्यात आली की पाेती चाेरीला गेली हे कळायला मार्ग नाही. मात्र, महामंडळाच्या भंडारा विभागीय कार्यालयाने या प्रकरणाच्या चाैकशीला सुरुवात केली आहे.

रामटेक तालुक्यात दरवर्षी आदिवासी विकास महामंडळ आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील धानाची किमान आधारभूत किमतीने खरेदी केली जाते. सन २०२०-२०२१ च्या हंगामासाठी भंडारबाेडी येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने धानाची पाेती ठेवण्यासाठी महादुला येथील शिवपार्वती वेअर हाऊस किरायाने घेतले आहे. या वेअर हाऊसमधील धानाचा साठा कमी आढळून आला आहे, अशी माहिती सहायक निबंधक रवींद्र वसू यांनी दिली असून, याबाबत आपण रविवारी (दि. १०) आदिवासी विकास महामंडळाच्या भंडारा येथील प्रादेशिक कार्यालयाला कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी देवरी (जिल्हा गाेंदिया) येथील उपप्रादेशिक अधिकारी आशिष मुळेवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुळेवार यांनी मंगळवारी (दि. १२) या गाेदामाची पाहणी केली. त्यांनी संस्थेचे प्रशासक पी. एस. चव्हाण, सचिव पी. पी. पोटभरे, सहायक सचिव गिरीष रहाटे यांच्यासह इतरांची मते नाेंदवून घेतली. त्यांना प्रादेशिक कार्यालयाकडे दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करावयाचा आहे. या प्रकरणात चाैकशी अहवालानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती रामटेक येथील प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी सुनील भगत यांनी दिली.

गाेदामातील धानाचे विवरण

सहायक निबंधक रवींद्र वसू यांच्या माहितीची तातडीने दखल घेत भंडारा येथील प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी साेमवारी (दि. ११) या गाेदामाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचासमक्ष धानाच्या पाेत्यांचे माेजमाप केले. अधिकाऱ्यांनी संस्थेने खरेदी केलेल्या धानाचे रेकॉर्ड ही तपासले. या केंद्रावर एकूण ९४४०.८० क्विंटल (२३६०२ पाेती) धानाची खरेदी करण्यात आली हाेती. भरडाईसाठी यातील ७३१५.४५ क्विंटल (१८८८८ पोती) धानाची उचल करण्यात आली. येथील साठा पुस्तकात साेमवारी (दि. ११) २१२५.३५ क्विंटल (४७१४ पोती) धान गोदामात शिल्लक दाखविण्यात आली. वास्तवात, गाेदामामध्ये १५१९.७६ क्विंटल धान कमी असल्याचे निष्पन्न झाले.

२०१९-२० मध्येही अफरातफर

महामंडळाच्या या धान खरेदी केंद्रावर २०१९-२०२० च्या हंगामात प्रत्यक्ष खरेदी केलेले धान व भरडाईसाठी उचल करण्यात आलेले धान यात २२३३.२१ क्विंटल (४८७० पाेती) ची तफावत आढळून आली हाेती. शासन नियमानुसार या धानाची एकूण किंमत ७९ लाख १३ हजार ५९२ रुपये एवढी होती. याबाबत महामंडळातर्फे ज्ञानेश्वर चौधर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. धानाची अफरातफर करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले हाेते. त्यामुळे रामटेक पाेलिसांनी भादंवि ४२०, ३४, ४०९ अन्वये गुन्हा नाेंदविला हाेता. या प्रकरणात काहींना अटक करण्यात आली. आराेपींमध्ये आदिवासी विकास महामंडळाचे काही कर्मचारी, प्रत्यक्ष धान खरेदीत कार्यरत कर्मचारी व राईस मिल मालकांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.

Web Title: Grain field disappears from Gada of Tribal Development Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.