ग्रामरक्षक दल ग्रामीण भागात प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:23 AM2017-11-03T01:23:12+5:302017-11-03T01:23:25+5:30
अवैध दारू विक्री, गुन्हेगारी कृत्य यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले ग्रामरक्षक दल हे ग्रामीण भागात प्रभावी ठरू लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध दारू विक्री, गुन्हेगारी कृत्य यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले ग्रामरक्षक दल हे ग्रामीण भागात प्रभावी ठरू लागले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गावांमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा मानस असून, सद्यस्थितीत ५० गावांमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर झाले, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ‘माध्यम संवाद’ उपक्रमात त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. अवैध दारू विक्री, वाहतूक तसेच सार्वजनिक शांततेस बाधा आणणाºयांविरुद्ध कारवाई करण्याच्या दृष्टीने ग्रामरक्षक दल नियमांतर्गत प्रत्येक गावात ग्रामसभेच्या मान्यतेने ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येते.
ग्रामरक्षक दलाकडून माहिती मिळताच पोलीस विभाग तथा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे १२ तासाच्या आत कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे. ही बाब लक्षात घेता प्रत्येक गावात ग्रामरक्षक दलाची निर्मिती करण्यासाठी पोलीस विभागातर्फे पुढाकार घेण्यात आल्याची माहिती बलकवडे यांनी यावेळी दिली.
पोलीस विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून, पोलीस स्टेशनस्तरावर ई-शासन तत्त्वाचा अवलंब करून सक्षम व प्रभावी पोलिसिंगमध्ये वाढ करण्यात येत आहे.
किमान वेळेत गुन्ह्याचा तपास व गुन्हेगार शोध घेण्यासाठी क्राईम अॅण्ड कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम सुरू करण्यात आली असून, यासाठी शासनाने स्वतंत्र लीज लाईनसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नसून, आॅनलाईन पद्धतीनेही तक्रार दाखल करता येऊ शकते. पोलीस विभागाकडून या पोर्टलवर तक्रार दाखल होताच गुन्ह्याचा तपास व गुन्हेगाराचा शोध यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यात येते. झालेल्या कार्यवाहीबद्दल तक्रारदारालासुद्धा माहिती उपलब्ध होते. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
सात दिवसात आॅनलाईन पासपोर्ट व्हेरीफिकेशन
ग्रामीण भागात पासपोर्टकरिता आॅनलाईन पासपोर्ट व्हेरीफिकेशनला लागणारा वेळ कमी करून संपूर्ण पडताळणी सात दिवसाचे आत करण्यात येणार आहे. नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईल टॅबद्वारे एम- पासपोर्ट पोलीस सेवाअॅप सुरु करण्यात आले आहे. पारपत्र तयार करण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये व जलद गतीने पडताळणी होऊन पासपोर्ट मिळावा म्हणून ही सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. पारपत्र विभाग पोलीस अधीक्षक कार्यालयास्तरावर आॅनलाईन करण्यात आला असून पोलीस स्टेशनस्तरावरही आॅनलाईन पद्धतीने सुरु करण्यासाठी २२ पोलीस स्टेशन आॅनलाईन जोडण्यात आले आहे.
स्मार्ट ठाण्यात उमरेड टॉप टेनमध्ये
स्मार्ट पोलीस स्टेशनअंतर्गत पहिल्या दहा पोलीस स्टेशनमध्ये उमरेड पोलीस स्टेशनचा समावेश झाला आहे. जिल्ह्यातील मौदा, कळमेश्वर, अरोली, बुटीबोरी व जलालखेडा या पोलीस स्टेशनची स्मार्ट पोलीस स्टेशन प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली आहे. सर्व सोईसुविधा युक्त सुसज्ज पोलीस स्टेशन इमारत आणि आवार पुरेसा शस्त्रसाठा, वाहने, सीसीटीव्ही कॅमेरे, लॉकअपमध्ये पुरेसे वायुविझन, स्मार्टफोनचा वापर, अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ मदत मिळण्यासाठी आपात्कालीन सेवासंपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी स्मार्ट पोलीस स्टेशन ही संकल्पना असल्याचे यावेळी बलवकडे यांनी सांगितले.
अवैध दारूच्या कारवाईत वाढ
दारुबंदी प्रभावीपणे राबविल्यामुळे सप्टेंबरपर्यंत २६४२ केसेस जिल्ह्यात दाखल झाल्या असून याअंतर्गत सुमारे ५ कोटी २३ लाख ५९ हजार ३१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा मुद्देमाल मागील तीन वर्षाच्या तुलनेत तीन ते पाच पट अधिक आहे. मागील वर्षी २५३६ केसेस करण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गत २ कोटी ११ लाख ६५ हजार ५७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. अवैध दारू उत्पादन व विक्री संदर्भात जिल्ह्यात प्रभावी कार्यवाही करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.