ग्रामपंचायत निवडणूक : ११८१ जागांसाठी २७९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:08 AM2021-01-05T00:08:01+5:302021-01-05T00:09:39+5:30

Gram Panchayat Election नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. आता जिल्ह्यातील १२८ ग्रा.पं.च्या ११८१  जागांसाठी २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे १५ जानेवारीला निवडणूक होईल.

Gram Panchayat Election: 2798 candidates in the fray for 1181 seats | ग्रामपंचायत निवडणूक : ११८१ जागांसाठी २७९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

ग्रामपंचायत निवडणूक : ११८१ जागांसाठी २७९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

Next
ठळक मुद्देसोनपूर (अदासा), जटामखोरा अविरोध : १२८ ग्रा.पं.मध्ये १५ जानेवारीला मतदान

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. आता जिल्ह्यातील १२८ ग्रा.पं.च्या ११८१  जागांसाठी २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे १५ जानेवारीला निवडणूक होईल. १८ जानेवारीला मतमोजणी होईल.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध ग्रा.पं.साठी इच्छुक असलेल्या ३२२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती ३१२० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (अदासा) ग्रा.पं.च्या ७ जागांसाठी सातच अर्ज आल्याने ही ग्रा.पं.आधीच अविरोध झाली होती. दरम्यान, सोमवारी सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली. येथे ७ जागांसाठी ९ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. यातील दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथील निवडणूकही अविरोध झाली आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत सोमवारी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया झाली. त्यामुळे आता गावागावांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवार (दि. ५) पासून गावागावांत राजकीय फड रंगणार आहेत. १३ जानेवारी रोजी प्रचारतोफा थंडावतील. नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असाच सामना रंगणार आहे. मात्र, काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांनी वेगवेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे येथील राजकीय पारा चढला आहे. यात कामठी, कुही आणि नागपूर (ग्रामीण) मधील काही ग्रा.पं.चा समावेश आहे. त्यामुळे काही गावांत दुरंगी, तर काही गावांत चौरंगी लढत होईल.

दवलामेटी, सातगाव वेणानगर येथे सर्वाधिक उमेदवार
नागपूर ग्रामीण तालुक्यातील दवलामेटी ग्रा.पं.च्या १७ जागांसाठी ७८ उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणानगर येथील १५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. तसेच कामठी तालुक्यातील कोराडी येथे १७ जागांसाठी ४३ उमदेवार आपले नशीब आजमावणार आहेत.

कोराडी, पाटणसावंगीकडे जिल्ह्याचे लक्ष
नागपूर जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या १२८ ही ग्रा.पं.मध्ये रंगतदार लढती होणार आहेत. मात्र, कामठी तालुक्यातील कोराडी आणि सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रा.पं.च्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कोराडी हे भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर पाटणसावंगी हे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे होमटाऊन आहे. कोराडीत कॉँग्रेस समर्थित पॅनल आणि भाजप समर्थित पॅनल अशी दुहेरी लढत होईल. मात्र, येथे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने याचा फटका कोणाला बसतो, याकडे लक्ष लागले आहे. येथे काही वाॅर्डात अपक्षांनीही दंड थोपटले आहेत. कोराडीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर आणि जि.प.सदस्य नाना कंभाले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाटणसावंगी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनल आणि भाजप समर्थित पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. या १७ सदस्यीय ग्रा.पं.मध्ये वॉर्ड क्रमांक ६ मध्ये निवडणूक अविरोध झाली आहे. त्यामुळे येथे उर्वरित ५ वॉर्डातील १४ जागांसाठी निवडणूक होईल. येथे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राय यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Web Title: Gram Panchayat Election: 2798 candidates in the fray for 1181 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.