ग्रा.पं.निवडणुकीतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:38+5:302021-01-10T04:07:38+5:30
प्रवीण धांडे याने लावला गळफास, महालगावात तर्कवितर्कांना उधाण कामठी : नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. यातच कामठी ...
प्रवीण धांडे याने लावला गळफास, महालगावात तर्कवितर्कांना उधाण
कामठी : नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. यातच कामठी तालुक्यातील महालगाव ग्रा.पं.च्या निवडणूक रिंगणातील तरुण उमेदवार प्रवीण भगवान धांडे (२३) याने शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रवीण याच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रवीण धांडे हा महालगाव-आसोली गट ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये काँग्रेस समर्थित ग्राम विकास आघाडीकडून सर्वसाधारण गटातून निवडणुकीला उभा होता. प्रवीण याने दुपारी ३ वाजेपर्यंत समर्थकासह वॉर्डात प्रचार केला. तो दुपारी ३.१५ वाजता सुमारास घरी आला. दुपारी ४ वाजता सुमारास त्याची आई कांताबाई खोलीत गेली असता प्रवीण छताला दोराने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या आईने शेजाऱ्याकडे मदतीची धाव घेतली. त्याला आधी उपचारासाठी नागपुरातील भवानी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासाअंती प्रवीण याला मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात हलविण्यात आला. मौदा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रवीण याचे वडील भगवान धांडे २०१० मध्ये महालगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. त्यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्याला एक धाकटा भाऊ आहे.
महालगाव ग्रा.पं.च्या ११ जागांसाठी एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. येथे खरी लढत ही महाविकास आघाडी समर्थित ग्राम विकास आघाडी आणि भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीत आहे. गावात प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना निवडणुकीतील उमेदवाराने आत्महत्या केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र पोलीस तपासाअंती त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.