ग्रा.पं.चा प्रचार थांबला : शुक्रवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:57 AM2021-01-14T00:57:21+5:302021-01-14T00:59:01+5:30

Gram Panchayat elections नागपूर जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या १३० पैकी १२७ ग्रा.पं.चा प्रचार बुधवारी सायंकाळी विविध राजकीय गटाच्या शक्तिप्रदर्शनानंतर थांबला. शुक्रवारी (दि.१५) रोजी येथे मतदान होईल. १८ जानेवारीला तालुकास्तरावर मतमोजणी होईल.

Gram Panchayat elections campaign stopped: Polling on Friday | ग्रा.पं.चा प्रचार थांबला : शुक्रवारी मतदान

ग्रा.पं.चा प्रचार थांबला : शुक्रवारी मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देगावागावात राजकीय गटांचे शक्तिप्रदर्शन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या १३० पैकी १२७ ग्रा.पं.चा प्रचार बुधवारी सायंकाळी विविध राजकीय गटाच्या शक्तिप्रदर्शनानंतर थांबला. शुक्रवारी (दि.१५) रोजी येथे मतदान होईल. १८ जानेवारीला तालुकास्तरावर मतमोजणी होईल.
जिल्ह्यात १३० ग्रा.पं.च्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या. १५ डिसेंबर रोजी स्थानिक तहसीलदारांनी या ग्रा.पं. निवडणुकीची अधिसूचना प्रकाशित केली होती. यानंतर गावागावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला होता. ४ जानेवारीला चिन्ह वाटपानंतर उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली होती. प्रचारादरम्यान कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेत प्रशासनाने उमेदवारांना कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांचे पालन करीत मतदारापर्यंत पोहचण्याचे आवाहन केले होते. मात्र गत दहा दिवसात जिल्ह्यात विविध ग्रा.पं.मध्ये झालेल्या प्रचारसभा आणि पदयात्रा दरम्यान कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे सर्वत्र उल्लंघन झाल्याचे दिसून आले. कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यात होणाऱ्या या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे.
जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (अदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळी कला ग्रा.पं.ची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता १२७ ग्रा.पं.साठी मतदान होत आहे. जिल्ह्यात ग्रा.पं.च्या ११८१ जागांसाठी २७९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात १४८३ महिला तर १३१३ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५०५ मतदान केंद्रावर ही निवडणूक होत आहे. तीत २,९१,०८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
महाविकास आघाडी-भाजपामध्ये टक्कर
नागपूर जिल्ह्यात काही ग्रा.पं.वगळता बहुतांशी गावात महाविकास आघाडी समर्थित पॅनेल आणि भाजपासमर्थित पॅनेलमध्ये थेट लढत होताना दिसत आहे. जिल्ह्यात १३० पैकी ८० ग्रा.पं.मध्ये भाजपाला पूर्णपणे यश मिळेल असा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केला आहे. इकडे निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची जिल्ह्यातील ताकद भाजपाला कळेल असे महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासन सज्ज
जिल्ह्यातील तेराही तालुक्यात स्थानिक प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर उद्या, गुरुवारी दुपारी १२ वाजतानंतर पोलिंग पार्ट्या रवाना करण्यात येतील. तेराही तालुक्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी उपस्थितीत इव्हीएमची तपासणी बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात काटोल तालुक्यातील ३, नरखेड (१७), सावनेर (११), कळमेश्वर (४), रामटेक (९), पारशिवनी (१०), मौदा (७), कामठी (९), उमरेड (१४),भिवापूर (३), कुही (२४), नागपूर (११) आणि हिंगणा तालुक्यातील ५ ग्रा.पं.साठी निवडणूक होत आहे.

एकूण ग्रा.पं: १३०

बिनविरोध : २

निवडणूक रद्द : १

मतदानाची वेळ : सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३०

Web Title: Gram Panchayat elections campaign stopped: Polling on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.