ग्रामपंचायतीने दिला दिव्यांगांना उत्पन्नातील तीन टक्के वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:48 AM2018-05-17T10:48:55+5:302018-05-17T10:49:05+5:30
डिगडोह या स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या उत्पन्नातील तीन टक्के वाटा हा दिव्यांगांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी दिला आहे. तब्बल ७० दिव्यांगांना प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण १० लाख ५० हजार रुपये समाज उत्थानासाठी या ग्रामपंचायतीने दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरमसाट उत्पन्न झाले तरी उत्पन्नातील काही वाटा हा समाजाच्या उत्थानासाठी करायचा नाही, असा मनुष्य स्वभाव आहे. परंतु त्यातही काही अपवाद असतातच. विशेष म्हणजे, एखाद्या संस्थेकडे बऱ्यापैकी पैसा जमा झाला तरी त्या पैशाचा उपयोग सामाजिक दायित्वांतर्गत केला जात नाही, हे वास्तव आहे. मात्र त्याला आडफाटा दिला आहे डिगडोह ग्रामपंचायतने.
डिगडोह या स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या उत्पन्नातील तीन टक्के वाटा हा दिव्यांगांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी दिला आहे. तब्बल ७० दिव्यांगांना प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण १० लाख ५० हजार रुपये समाज उत्थानासाठी या ग्रामपंचायतीने दिले. काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे मौदा तालुक्यातील रेवराल ग्रामपंचायतीनेही मदत केली होती. या माध्यमातून आता ग्रामपंचायतींमध्ये चांगला पायंडा पडत आहे.
डिगडोह ग्रामपंचायतीने कर वसुलीचे उद्दिष्ट निधारित केले. ते उद्दिष्ट गाठल्याने उत्पन्नातील तीन टक्के निधी हा दिव्यांगांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, त्यांना साहित्य खरेदी करता यावे, यासाठी देण्याचा निर्णय घेतला. यानुसार एकूण ७० दिव्यांग बांधवांची यादी तयार करण्यात आली. त्या दिव्यांग बांधवांना प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे तब्बल १० लाख ५० हजार रुपये देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यानुसार दिव्यांग बांधवांना बुधवारी (दि. १६) ग्रामपंचायतमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात धनादेश सुपूर्द करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच चेतनलाल पांडे, उपसरपंच रमेशसिंह राजपूत, ग्रामविकास अधिकारी दिगंबर लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास गिरी, शालिनी काकडे, विनोद ठाकरे, बबन आव्हाले, प्रदीप कोटगुले, संदीप साबळे, राकेश उमाळे, मंगला रडके, इंद्रायणी काळबांडे, चंद्रमती चतुर्वेदी, रजनी शेंगर, नलिनी तोडासे, विद्या देवगडे, गायत्री पटले यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करणारी डिगडोह ही नागपूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
यांना केले अर्थसाहाय्य
कर वसुलीतील तीन टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना देण्यात आला. डिगडोह ग्रामपंचायतमध्ये अशा एकूण ७० दिव्यांग बांधव, भगिनींचा समावेश असून त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये नीलेश बन्सोड, मेहरा ढोरे, किरा भागवत, संदीप मडावी, क्षितिज भांगे, अरविंद हिवरे, ज्ञानेश्वर भगत, निहाल दोमकुंडवार आदींचा समावेश आहे. या सर्वांना दिव्यांग साहित्य, लॅपटॉप, शेवई मशीन, पीठ गिरणी, मासिक औषध आदी कामासाठी हा निधी देण्यात आला.