शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायती, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:24+5:302021-07-14T04:11:24+5:30
जिल्ह्यातील एकूण शाळा : १) जिल्हा परिषदेचा शाळा - १,५३० २) नगर परिषदेच्या शाळा - ६८ ३) महापालिकेच्या शाळा ...
जिल्ह्यातील एकूण शाळा :
१) जिल्हा परिषदेचा शाळा - १,५३०
२) नगर परिषदेच्या शाळा - ६८
३) महापालिकेच्या शाळा - १५६
४) अनुदानित शाळा - १,२०२
५) विना अनुदानित शाळा - १ १५५
जिल्ह्यातील एकूण गावे - १,७७१
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे - १,६८१
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
नरखेड - १५३
काटोल - १६२
कळमेश्वर - १६०
सावनेर - १२६
पारशिवनी - १०८
रामटेक - १५७
मौदा - १२४
कामठी - १५
नागपूर ग्रामीण - १५४
हिंगणा - १०७
उमरेड - १३२
कुही - १४७
भिवापूर - १३६
नागपूर : लॉकडाऊन काळात शिक्षण बंद ठेवू नये, अशी राज्य सरकारची भूमिका होती. त्यामुळे ऑफलाईन शिक्षण पद्धतीने ऑनलाईनकडे वाटचाल केली. मात्र, ग्रामीण भागात हा प्रयोग फसला. आता जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोनामुक्त होत असल्याने शाळा सुरू करण्याची प्रशासनाची तयारी आहे. मात्र, गावातील शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि पालकांची संमती लागणार आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण १,७७१ गावे आहेत. या गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद, खासगी शैक्षणिक संस्था, शासकीय आणि खासगी आश्रम शाळांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. मात्र, गत १६ ते १७ महिन्यांपासून शाळा बंद असलेल्या ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य थांबले आहे. मधल्या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला. मात्र, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन, इंटरनेट सेवेचा अभाव असल्याने ही पद्धती यशस्वी होऊ शकली नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १,४३,०३५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. आतापर्यंत यातील १,४०,५०४ कोरोनामुक्त झाले, तर २३०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी जिल्ह्यातील तेरा तालुक्यात केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. सध्या ग्रामीण भागात ४५ सक्रिय रुग्ण आहेत. सध्याची परिस्थिती पाहता बहुतांश तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला अद्याप वेग आला नसल्याने तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत विविध मतप्रवाह आहेत.
आतापर्यंत ७ ग्रामपंचायतींचा ठराव
जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र, याबाबत ग्रामपंचायतींनी सावध भूमिका घेतली आहे. आतापर्यंत केवळ ७ ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याबाबत ठराव केला आहे. उर्वरित ठिकाणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
--
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल व नेटवर्कची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षण पद्धती यशस्वी होऊ शकली नाही. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे. यासोबतच शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन होणे तेवढेच गरजेचे आहे. यासाठी शिक्षक व शाळेवरच ही जबाबदारी न टाकता पालकांनाही महत्त्वाची भूमिका पार पाडणे गरजेचे आहे.
श्रावण भा. ढवंगाळे, नागपूर ग्रामीण
---
मौदा येथील जनता प्राथमिक शाळेमध्ये चौथ्या वर्गात मुलगा, तर जनता विद्यालयामध्ये सहाव्या वर्गात मुलगी शिकत आहे. आनलाईन वर्गामुळे मुलांमध्ये कोणताही बदल झाला नाही. उलट चांगल्या सवयी व शिस्त बिघडल्या आहेत. शासनाने शक्य तितक्या लवकर शाळा सुरू कराव्यात.
सुभाष भदाडे, पालक, चिचघाट पुनर्वसन, ता. मौदा
---
शाळा सुरू करण्यासंदर्भात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र पाठविले आहे. त्यांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घ्यावी. ग्रामपंचायतीची परवानगी असेल तर शाळा सुरू करायला हरकत नाही.
- चिंतामण वंजारी
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर