ग्रामसेवकाने केला लाखो रुपयांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:34 PM2020-11-04T23:34:23+5:302020-11-04T23:35:41+5:30
Corruption by Gramsevak नागपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पांजरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने, उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पांजरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने, उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या ग्रामसेवकाने ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आलेली विकासकामे केवळ कागदावर दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील पारिजातक गृहनिर्माण सहकारी संस्था आहे. या संस्थेअंतर्गत जवळपास ३०० फ्लॅट आहेत. या परिसरात विविध रस्त्यांची कामे, मैदानाच्या कम्पाऊंड वॉलची कामे व इतर विकासकामे मंजूर झाली होती. कागदावर ही कामेही झालीत. पण प्रत्यक्षात कुठलीही कामे झाली नाहीत. यासंदर्भात संस्थेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सीईओंना तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली आहे. ग्रामसेवक पंकज चाफले याने ग्रामपंचायतीचा १४,३१,९३६ रुपयांच्या निधीची स्वत:साठी उचल केली. मनरेगाच्या कामाची १५ हजार रुपयांची रक्कम स्वत: उचलली, मजुरांचे नाव असलेले २,६२,११० रुपयांचे धनादेश स्वत: उचलले. पंकज चाफलेची मौदा येथील मारोडी ग्रामपंचायतीत बदली झाली. पांजरी ग्रा.पं.मधून कार्यमुक्त झाल्यानंतर ६,४६,५६२ रुपये धनादेशाने काढले. बँकेच्या विवरण पत्रावरून पंकज चाफले याने आर्थिक व्यवहार केल्याचे आढळून आल्याने, त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली.