नागपुरात भव्य राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 07:07 PM2018-01-03T19:07:15+5:302018-01-03T19:17:05+5:30
यावर्षीचा राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव ५ ते १० जानेवारीपर्यंत महालमधील चिटणीस पार्क मैदानावर होणार आहे. रोज सायंकाळी ६.३० वाजता कीर्तनाला प्रारंभ होईल. संतदर्शन हा कीर्तनाचा विषय आहे. महोत्सवात युवा कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : यावर्षीचा राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव ५ ते १० जानेवारीपर्यंत महालमधील चिटणीस पार्क मैदानावर होणार आहे. रोज सायंकाळी ६.३० वाजता कीर्तनाला प्रारंभ होईल. संतदर्शन हा कीर्तनाचा विषय आहे. महोत्सवात युवा कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
संयोजक श्रीपाद रिसालदार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाची विस्तृत माहिती दिली. राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव आयोजन समिती व राधा-गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष होय. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रफुल्ल माटेगावकर प्रस्तुत ‘सह्याद्रीतील सात रत्ने’ कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर आचार्य जितेंद्रनाथ महाराज (देवनाथमठ, अंजनगावसुर्जी) यांच्या हस्ते महोत्सवाच्या संकेतस्थळाची सुरुवात केली जाईल. ६ जानेवारी रोजी शेखरबुवा व्यास (पुणे) हे ‘संत ज्ञानेश्वर’, ७ जानेवारी रोजी मानसी बडवे (पुणे) या ‘संत मीराबाई’, ८ जानेवारीला दिगंबरबुवा नाईक (नागपूर) हे ‘संत तुकडोजी महाराज’, ९ जानेवारी रोजी श्रेयसबुवा बडवे (पुणे) हे ‘संत तुलसीदास’ तर, १० जानेवारीला संदीपबुवा मांडके (पुणे) हे ‘संत कबीर’ विषयावर कीर्तन करणार आहेत. महोत्सवातून जमा होणाऱ्या आरतीच्या पैशांसह एकूण ५१ हजार रुपये उत्तर नागपुरात गरीब मुलांसाठी शाळा चालविणारे नागेश पाटील यांना प्रदान केले जाणार आहेत असे रिसालदार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत हभप दिगंबरबुवा नाईक, पुष्कर लाभे, रमेश पोफळी आदी उपस्थित होते.
विदर्भातील कीर्तनकार मोठी बिदागी मागतात
विदर्भातील काही प्रसिद्ध कीर्तनकार अव्वाच्यासव्वा बिदागी (मानधन) मागत असल्यामुळे त्यांचे कीर्तन महोत्सवात ठेवता येत नाही. त्यांची बिदागी आयोजकांना झेपत नाही. परिणामी नाईलाजास्तव विदर्भाबाहेरच्या कीर्तनकारांना निमंत्रित करावे लागते अशी खंत रिसालदार यांनी व्यक्त केली.