संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात; मुख्यमंत्र्यांकडून संघाबाबत कौतुकोद्गार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 08:43 PM2023-04-27T20:43:02+5:302023-04-27T20:44:31+5:30

Nagpur News संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संघाबाबत कौतुकोद्गार काढत कार्यप्रणालीची प्रशंसा केली.

Grand projects with team support are easy to build; Appreciation from the Chief Minister about the team | संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात; मुख्यमंत्र्यांकडून संघाबाबत कौतुकोद्गार 

संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात; मुख्यमंत्र्यांकडून संघाबाबत कौतुकोद्गार 

googlenewsNext

नागपूर : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे नागपुरात प्रथमच एका मंचावर एकत्रित आले. यावेळी संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संघाबाबत कौतुकोद्गार काढत कार्यप्रणालीची प्रशंसा केली.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, एनसीआयचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, आनंद औरंगाबादकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सरसंघचालक मोहन भागवत हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी त्यांचे वैचारिक पाठबळ नेहमीच असते. एनसीआयच्या रूपातून हेच दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी ते काहीसे भावुकदेखील झाले. देवेंद्र फडणवीस यांनी कॅन्सरमुळे त्यांचे वडील गमावले त्याचप्रमाणे माझी आईदेखील ती वेदनादायी आठवण आहे. मात्र, वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून सार्वजनिक दुःखावर उपाय शोधण्याचा विचार करणे, हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे लक्षण आहे. तेच फडणवीस यांनी दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपापल्या भागात अशी सेवाव्रती आरोग्य मंदिरे उभारावी, अशी अपेक्षाही व्यक्त करत अशा संस्थांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहील, असे त्यांनी सांगितले. जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले.

कॅन्सरग्रस्त रुग्णांना हिंमत देणे महत्त्वाचे

कॅन्सर हा दुर्धर आजार असून, कॅन्सरग्रस्तांना आपलेपण व हिमतीची गरज असते. सरकार एकीकडे संस्था उभारतेच, मात्र आरोग्य सारख्या सार्वजनिक विषयावर देशातील सर्व जनतेने स्वतःही पुढे येणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेसाठी एनसीआयप्रमाणे संस्था उभारण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले.

कॅन्सर उपचारांवर देशात संशोधन हवे

अमेरिकेत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारीवरील उपचारावर देशात संशोधन झाले पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

सिकलसेलवर संशोधन केंद्र उभारणार

रुग्णांच्या नातेवाइकांच्या नि:शुल्क निवासासाठी एनसीआयमध्ये धर्मशाळा उभारण्यात येणार आहे. पूर्व विदर्भात थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून, या आजारावर संशोधन व उपचार करण्यासाठी येत्या काळात संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

अदानी कार्यक्रमात, मात्र मंचावर नाही

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी इस्पितळाची पाहणीदेखील केली. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान ते मंचावर उपस्थित नव्हते. विशेष विमानाने गुरुवारी सकाळी त्यांचे नागपुरात आगमन झाले.

Web Title: Grand projects with team support are easy to build; Appreciation from the Chief Minister about the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.