आजी-आजोबांना नवे वर्ष नव्या जन्मासारखे

By admin | Published: December 31, 2014 01:09 AM2014-12-31T01:09:57+5:302014-12-31T01:09:57+5:30

सतत नाविन्याचा शोध घेणे, हे तारूण्याचे लक्षण असते. प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो अन् या शिकण्याची लालसा बाळगणारे प्रत्येक क्षण तरुण असते. म्हणूनच नव्या वर्षाच्या स्वागताची

Grandfather new year is like new born | आजी-आजोबांना नवे वर्ष नव्या जन्मासारखे

आजी-आजोबांना नवे वर्ष नव्या जन्मासारखे

Next

नागपूर : सतत नाविन्याचा शोध घेणे, हे तारूण्याचे लक्षण असते. प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो अन् या शिकण्याची लालसा बाळगणारे प्रत्येक क्षण तरुण असते. म्हणूनच नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या आजोबांनी प्रश्न उपस्थित केला, ‘कोण म्हणतंय आम्ही म्हातारे झालो? सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांना अजूनही येणारे प्रत्येक नवे वर्ष म्हणजे नवा जन्म झाल्यासारखे वाटते. आयुष्याची आसक्ती कधीही संपत नसते. म्हणूनच तरूण कवीची गाणी या ‘पिकलेल्या’ माणसांच्या मोबाईलमध्ये आढळली.
तुटून गेल्या तारा तरीही
मनापासूनी पुन्हा गायचे
नवे वर्ष हे कसे जायचे
कुणास ठाऊक कसे व्हायचे ....
नव्या वर्षाचे स्वागत करताना बड्या बुजर्गांना अशी हुरहूर वाटणे स्वाभाविकच. पण म्हणून काही त्यांनी ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ला रामराम ठोकला नाही. नोकरीतून किंवा घरगुती जबाबदाऱ्यातून निवृत्त झालेल्या वृद्धांच्या भावना थोडीच निवृत्त झाल्यात? ‘थर्टी फर्स्ट’ला रात्री तेही जल्लोष करणारच आहेत. आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या म्हाताऱ्या मनालाही आनंदाची पेन्शन हवी असते. फक्त आनंदी असण्याचे त्यांचे नियम जगावेगळे आणि साधेसुधे असतात. गुरुवारी येणारे नवीन वर्ष ज्येष्ठ मंडळीही साजरे करणार आहेत... आपल्या अदबीने! मुलगा-सून, जावई-मुलगी, नातू-नात अशा गोतावळ्यात निवृत्तीनंतरचे आयुष्य जगणाऱ्या आजी-आजोबांना सहसा ज्येष्ठ नागरिक म्हणून बाजूला केले जाते.
हाती हात असावा बस्स!
सिनियर सिटीझन फोरमचे सदस्य असलेले आजोबा आजीला घेऊन फिरायला निघाले होते. ते म्हणाले, ‘आतापर्यंत आम्ही सोबत जगलो, नव्या वर्षात पाऊल ठेवताना एकमेकांची सोबत असावी बस्स! हाती हात असावा. दुसरे काही मागणे नाही. एकमेकांशी खरे बोलले तर सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतात. नव्या तरूणांनी एवढा मंत्र जपला, तरी आयुष्यातील सारीच वर्षे आनंदी होतील.
वयोवृद्धांना थर्टीफर्स्ट विषयी काय वाटते. सेलिब्रेशनबाबत ते तटस्थ असतात? काय असते त्यांच्या मनात नव्या वर्षाविषयी? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी लोकमतने लाफ्टर क्लब, योगासन मंडळे, बगिचे अशा स्थळांवर ज्येष्ठांना गाठून त्यांच्याशी संवाद साधला. आयुष्याचा दांडगा अभ्यास झालेले हे वृद्ध तरूण भरभरून बोलले, तेही कवटाळणार आहेत नव्या वर्षाचा आनंद. तेही करणार आहेत जल्लोष. महत्त्वाचे म्हणजे तरूणांपेक्षा वृद्धांच्या सेलिबेशनचे स्वरूप थोडे साधेसुधे असले तरीही अस्सल आहे.
मै जिंदगी का साथ निभाता चला गया सक्करदरा रोड, चिटणविसपुरा येथील खोंडे उद्यानात नियमित येणारा ज्येष्ठांचा गू्रप म्हणाला, ‘आमचे फक्त केस पिकले आहेत, आम्ही म्हातारे कशावरून? नव्या वर्षाला आम्ही सर्वजण एकत्र बसून नाश्ता करणार आहोत’. या ग्रूपमधले एक आजोबा म्हणाले, माझा आवडता हास्य अभिनेता देवेन वर्मा यांच्या मृत्यूने या वर्षी चटका लावला. पण नव्या वर्षाचे स्वागत करताना त्याचा अभिनय विसरता येणर नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Grandfather new year is like new born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.