अंधार कोठडीतील पणत्या पेरणार समाजमनात प्रकाश; कारागृहातील वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 09:18 PM2022-10-18T21:18:23+5:302022-10-18T21:18:48+5:30
Nagpur News कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या पणत्यांसह विविध वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावर लावण्यात आली आहे.
नागपूर : कारागृहातील अंधार कोठडीत राहणाऱ्या कैद्यांनी तयार केलेल्या पणत्या (मातीचे दिवे) या दिवाळीत घराघरांत, समाजमनात प्रकाश पेरणार आहेत. कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या पणत्यांसह विविध वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावर लावण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन राज्य माहिती आयोगाचे नागपूर विभागाचे आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले.
कारागृहातील बंदिस्त कैदी बाहेर पडल्यानंतर स्वावलंबी व्हावे, त्यांना रोजगाराची चणचण भासू नये म्हणून त्यांना कारागृहात विविध वस्तू निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. येथील मध्यवर्ती कारागृहात पाचशेंवर कुशल कारागीर आहेत, जे वेगवेगळ्या कलेत निपुण आहेत. त्यांच्याकडून बनविले जाणारे फर्निचर, दऱ्या, टॉवेल, चादर, रुमाल, लोखंडी तसेच कापडाच्या शोभेच्या वस्तूंना मोठी मागणी असते. दरवर्षी कैद्यांकडून रक्षाबंधनाच्या वेळी आकर्षक राख्या, तर दिवाळीपूर्वी विविध शोभेच्या वस्तू आणि पणत्या बनविल्या जातात. यंदाही मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती करण्यात आली. कारागृहात निर्मित वस्तूंच्या विक्रीचे केंद्र अजनी रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आले आहे.
या विक्री केंद्रावर दिवाळीच्या निमित्ताने रंगीबेरंगी पणत्या, हातमागाच्या साड्या, लाकडी व लोखंडी शोभेच्या वस्तू, दऱ्या, शो पीस, कपडे, चादर, टॉवेल, आसन पट्ट्या, आदी विविध वस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली. त्याचे उद्घाटन माहिती आयोगाचे आयुक्त राहुल पांडे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता केले. यावेळी धंतोलीच्या ठाणेदार प्रभावती एकुरके, मैत्री परिवाराचे चंदूजी पेंडके, विजय जथे, कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे, उपअधीक्षक दीपा आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वामन निमजे, आनंद पानसरे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कैद्यांनी निर्माण केलेल्या एकापेक्षा एक चांगल्या वस्तू बघून पाहुण्यांनी कारागीर कैद्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
हीच आमची खरी दिवाळी
आम्ही अंधार कोठडीत राहत असलो आणि त्यामुळे आमच्या घरी उत्साहाने दिवाळी साजरी केली जात नसली तरी आम्ही निर्माण केलेल्या पणत्या अनेक घरासमोरचा अंधार दूर करणार आहेत. गावोगावी, गल्लोगल्ली या पणत्या प्रकाश पेरणार आहेत, त्याची जाणीव आम्हाला आहे. तीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे, अशी भावना यावेळी कार्यक्रमाच्या वेळी कारागीर कैद्यांनी व्यक्त केली.
----