मुलगी अन नातवाच्या संघर्षाला आजीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:23 PM2020-07-25T22:23:50+5:302020-07-25T22:26:33+5:30
अचानक जावयाचे निधन झाले अन मुलीच्या संसारावर संकटाचा डोंगर कोसळला. नातवाचे ऐन दहावीचे पेपर सुरू होते त्यावेळी. या परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीत डोक्यावरचा पदर कमरेला खोचणारी मुलगी व नातवाच्या संघर्षात मिळालेला आजीचा आधार जगण्याचे बळ देणारा ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिस्थितीचे संकट कधी व कसे येईल, हे सांगता येत नाही. तुकडोजी चौकात फूटपाथवर नातवाला घेऊन भाजीपाला विकणाऱ्या आजीने ते सांगितले. अगदी चारच महिन्यापूर्वी मुलीच्या आयुष्यात सर्व सुरळीत सुरू होते. संसार गरिबीचा असला तरी समाधानाचा होता पण अचानक जावयाचे निधन झाले अन मुलीच्या संसारावर संकटाचा डोंगर कोसळला. नातवाचे ऐन दहावीचे पेपर सुरू होते त्यावेळी. या परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीत डोक्यावरचा पदर कमरेला खोचणारी मुलगी व नातवाच्या संघर्षात मिळालेला आजीचा आधार जगण्याचे बळ देणारा ठरला.
शांताबाई हटवार (७०) रा. नीलज खंडाळा, असे या आजीचे नाव आहे. त्यांची मुलगी कल्पना तळेकर ही मानेवाडा रोडवर बजरंगनगरात राहते. जावई लहानु तळेकर हेही भाजीपाला विक्रेते होते. परंतु मार्च महिन्यात हार्टअटॅकने त्यांचे निधन झाले. मुलगा रविकांत त्यादिवशी दहावीचा पहिलाच पेपर द्यायला गेला होता. घरातील कमावती तरुण व्यक्ती अशी अचानक सोडून जाण्याने कुटुंबावर संकट येणे सहाजिक होतेच. हे संकट आर्थिकही होते आणि सामाजिकही. कल्पना यांना भाजीपाला विक्रीचा अनुभव होता पण केवळ पतीसमवेत असताना. मात्र उत्पन्नाचे साधनच बंद झाले आणि त्यांनी परिस्थितीचे आव्हान स्वीकारत पतीचा भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. या कामात त्यांचा मुलगा रविकांतही त्यांना मदत करीत आहे. परंतु मुलीवर आलेल्या संकटामुळे आजी शांताबाई अस्वस्थ झाल्या. त्यांना दोन मुले असून ते शेती करतात. कठीण परिस्थितीत भावांनीही कल्पना यांना मदत केली. परंतु शांताबाई मुलीच्या संसाराचा भाग होत आधारवड झाल्या. त्यांनी आपल्या नातवाला घेऊन दुसरे भाजीपाल्याचे दुकान सुरु केले. एका चौकात मुुलगी तर दुसºया चौकात आजी आणि नातू भाजीपाल्याचे दुकान लावतात. नातवाने दहावीची परीक्षा दिली आहे. परंतु त्याच्या पुढील शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उदरभरणासाठीच हा संघर्ष चालला असल्याची भावना त्या आजीने सहज बोलताना व्यक्त केली.