भीषण अपघातात तरुणासह आजी-नातीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 08:53 PM2023-04-29T20:53:05+5:302023-04-29T21:03:42+5:30
Nagpur News विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजी व नातीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
नागपूर : वेगात जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक तरुण, त्याची आई आणि मुलगी हे तिघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी फाटा येथे शनिवारी (दि. २९) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये निक्की हरगोविंद बावणे (३३), त्याची आई भागवंताबाई हरगोविंद बावणे (६०) व मुलगी इशानी निक्की बावणे (७) या तिघांचा समावेश असून, मुलगा युग निक्की बावणे हा गंभीर जखमी झाला आहे. निक्की हा मूळचा पल्ला कामठी, जिल्हा बालाघाट (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ताे पाच वर्षांपासून काेराडी (ता. कामठी) नजीकच्या गोधणी (रेल्वे) येथे मिस्त्री काम करायचा. नातेवाईकांकडे लग्न असल्याने ताे आई व दाेन मुलांना घेऊन एमएच ४०-सीई ५२२८ क्रमांकाच्या माेटारसायकलने बालाघाटला जात हाेता.
ताे आमडी (फाटा) परिसरात जबलपूरहून नागपूरच्या दिशेने वेगात येणाऱ्या एनएल ०१-एएफ ६८०५ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यामुळे निक्की, त्याची आई व मुलगी ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर युग बाहेर फेकला गेल्याने ताे गंभीर जखमी झाला. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. युगवर प्राथमिक उपचार करून त्याला उपचारासाठी नागपूरला रवाना केले.
अपघातानंतर ‘रास्ता राेकाे’
शनिवारी सकाळी अपघात हाेताच परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घटनास्थळी ‘रास्ता राेकाे’ केला. त्यामुळे पाेलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. अपघात व आंदाेलनामुळे जबलपूर-नागपूर लेन व सर्व्हिस राेडवर किमान दाेन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली हाेती. हे आंदाेलन एक तास चालले. आ. सुनील केदार आणि तहसीलदार हंसा मोहने यांनी नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले.
हवाई पुलाचा उपयाेग काय?
आमडी (फाटा) अपघातप्रवण स्थळ असल्याने आजवर या परिसरात २० पेक्षा अधिक छोटे-माेठे अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही येथील अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. याठिकाणी हवाई पूल तयार केला आहे. त्याऐवजी पटगोवारीकडे जाणाऱ्या राेडवर अंडरपास तयार करायला हवा हाेता. यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. त्यामुळे अपघात हाेताच नागरिकांनी रास्ता राेकाे करून रोष व्यक्त केला.