नागपुरात नातवाने केली आजीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 10:49 AM2020-03-04T10:49:23+5:302020-03-04T10:51:37+5:30
दारुड्या नातवाने क्षुल्लक कारणावरून आजीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानवतानगर टीव्ही टॉवरजवळ सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारुड्या नातवाने क्षुल्लक कारणावरून आजीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानवतानगर टीव्ही टॉवरजवळ सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी लकी सुंदर गणवीर (वय २०) याला अटक केली आहे.
राऊलाबाई रामदास गणवीर (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ती टीव्ही टॉवरजवळच्या मानवतानगर झोपडपट्टीत राहत होती. तिच्याजवळ आरोपी लकी तसेच त्याची बहीण निकिता राहत होती. तर, लकी आणि निकिताची आई सरिता सुंदर गणवीर (वय ४५) ही चिंतामणी नगर, भिवसनखोरी येथे राहते. आरोपी लकी भाजीच्या दुकानात काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्याची बहीण निकिता कॅटरर्सच्या कामाला जाते. कामावरून रात्री उशिरा घरी परत येत असल्याने आरोपी निकिताला वारंवार घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करायचा. सोमवारी रात्री तसेच झाले. नातीला (निकिताला) नेहमी नेहमी लकी मारत, रागावत असल्याने आजी राऊलाबाई लकीला विरोध करायची, चिडायची. सोमवारी रात्री लकीने निकिताला घाणेरड्या शिव्या दिल्याने आजी त्याच्यावर रागावली. तिने त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यामुळे आरोपी संतापला. मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास तो बाहेर जाऊन दारू पिऊन आला आणि झोपेत असलेल्या आजीच्या डोक्यात भला मोठा दगड घालून तिची हत्या केली. वृद्ध राऊलाबाईची किंकाळी ऐकून बाजूचा एक जण धावला. राऊलाबाई रक्ताच्या रक्ताच्या थारोळ्यात दिसताच त्याने १०० नंबरवर फोन करून नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार सुनील गांगुर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत तेथे मोठी गर्दी जमली होती.
हत्या सासूची, सुनेची तक्रार, मुलगा आरोपी!
आपल्या सासूची हत्या मुलाने (लकीने) केल्याची तक्रार आरोपीची आई आणि मृत राऊलाबाइची सून सरिता गणवीर हिने नोंदवली. त्यावरून गिट्टीखदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोप लकीला अटक केली. या हत्याकांडामुळे मानवतानगर झोपडपट्टीत शोककळा पसरली आहे.
आरोपीचा कांगावा
आजीची हत्या केल्यानंतर आरोपी लकी झोपड्याबाहेर आला. बाजूची मंडळी धावत आल्याचे पाहून त्याने आजीची कुणीतरी हत्या केल्याचा कांगावा सुरू केला. पोलिसांचीही त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातावर, कपड्यावर रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या होत्या. ते पाहून पोलिसांनी त्याच्या दोन कानशिलात लगावताच त्याने हत्येची कबुली दिली.