आगीत हरभऱ्याची गंजी खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:21+5:302021-03-23T04:09:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : शेतातून गेलेल्या विद्युत तारेवर शाॅर्ट सर्किट झाल्याने, हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. त्यात संपूर्ण पीक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : शेतातून गेलेल्या विद्युत तारेवर शाॅर्ट सर्किट झाल्याने, हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. त्यात संपूर्ण पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रत्नापूर शिवारात साेमवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास घडली.
रत्नापूर येथील शेतकरी सरावन हरिश्चंद्र देशपांडे यांची रत्नापूर शिवारात अडीच एकर शेती असून, त्यांनी नुकतीच हरभरा व तूर पिकाची कापणी करून शेतात गंजी लावून ठेवली हाेती. साेमवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळ सुटल्याने शेतातून गेलेल्या विद्युत तारांना एकमेकांवर घर्षण हाेऊन शाॅर्ट सर्किट झाले. यामुळे ठिणगी उडून हरभऱ्याच्या गंजीने पेट घेतला. काही क्षणातच आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण हरभरा व तूर पिकाची राखरांगाेळी झाली. आगीच्या घटनेमुळे शेतकरी सरावन देशपांडे यांचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी आकाश शेंडे यांनी पंचनामा करून, अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना पाठविला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास महावितरण व शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.