चाकू हल्ल्यात एक गंभीर जखमी : भांडण करणाऱ्यांना हटकणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 08:03 PM2018-11-09T20:03:27+5:302018-11-09T20:04:57+5:30
आपसात वाद घालणाऱ्यांना हटकणे एका व्यक्तीला मोठे महागात पडले. वाद घालणाऱ्या आरोपींनी चाकू हल्ला करून हटकणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपसात वाद घालणाऱ्यांना हटकणे एका व्यक्तीला मोठे महागात पडले. वाद घालणाऱ्या आरोपींनी चाकू हल्ला करून हटकणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यात दिनेश भोजराज शेटे (वय ४०, रा. लालगंज) हे गंभीर जखमी झाले.
किशोर श्यामराव नंदनवार (वय ४०) हे पाचपावलीतील बांगलादेश नाईक तलाव परिसरात राहतात. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ते त्यांचा मावसभाऊ दिनेश शेटे यांच्याकडे भेटायला आले होते. यावेळी शेटे यांच्या घराशेजारी सार्वजनिक नळावर आरोपी गोलू ऊर्फ जगदीश राघोजी उमरेडकर, सचिन गोपीचंद भानुसे, नीलेश ऊर्फ भांजा सोनटक्के, रोशन नानोटकर आपसात वाद घालत एकमेकांना शिवीगाळ करीत होते. ते पाहून दिनेश शेटे यांनी त्यांना कशाला वाद घालता, असे म्हणून हटकले. त्यावर ‘तू आम्हाला हटकणारा कोण’, असे विचारत आरोपींनी त्यांना मारहाण केली. एवढेच नव्हे आरोपी गोलूने दिनेशच्या गळ्यात हात घातला आणि त्यांना बाजूला नेऊन त्यांच्या गळ्यावर, पोटावर चाकूचे सपासप घाव घातले. गंभीर जखमी झालेल्या दिनेशला वाचविण्यासाठी किशोर नंदनवार धावले असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या दिनेशला मेयोत दाखल करण्यात आले. माहिती कळल्यानंतर शांतीनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी नंदनवार यांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रात्रभर धावपळ करून आरोपी उमरेडकर, भानुसे आणि सोनटक्के या तिघांना अटक केली. चवथा आरोपी नानोटकर फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.