नागपूरची महान संस्कृती घेऊन आसाममध्ये यशस्वी होईल
By admin | Published: October 23, 2016 02:41 AM2016-10-23T02:41:45+5:302016-10-23T02:41:45+5:30
राज्यपालपद ही मोठी जबाबदारी आहे. या पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करील. आसामची तनमनाने सेवा करील. तेथे नागपूरचे नाव चमकेल.
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार : मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरींची उपस्थिती
नागपूर : राज्यपालपद ही मोठी जबाबदारी आहे. या पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करील. आसामची तनमनाने सेवा करील. तेथे नागपूरचे नाव चमकेल. नागपूरची महान संस्कृती घेऊन मी आसाममध्ये यशस्वी होईल, असा विश्वास आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केला.
नागपूरचे सुपुत्र व माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल नागरी सत्कार समारोह समितीतर्फे पुरोहित यांचा शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पुरोहित यांनी नागपूरने दिलेल्या प्रेमापोटी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विकास सिरपूरकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संयोजक खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार दत्ता मेघे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, भाजपचे महामंत्री संदीप जोशी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्यपाल पुरोहित यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पत्नी पुष्पादेवी पुरोहित यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी नागपूर महापालिकेतर्फे महापौर प्रवीण दटके यांनी राज्यपाल पुरोहित यांचा सत्कार केला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, नागालॅण्डचे राज्यपाल पी. बी. आचार्य, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी या सत्कार सोहळ्यासाठी शुभेच्छा संदेश पाठविला. दयाशंकर तिवारी यांनी मानपत्र वाचन केले. गिरीश गांधी यांनी आभार मानले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य, आ. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री रमेश बंग, अॅड. सुलेखा कुंभारे, माजी महापौर अटलबहादूर सिंग, आ. सुनील केदार, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, उपमहापौर सतीश होले, उमेश चौबे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष अजय पाटील, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा, जयप्रकाश गुप्ता, डॉ. राजीव पोतदार, यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फडणवीस, गडकरींनी केली पंतप्रधानांकडे मागणी
दोन वर्षांपासून ऐकत होतो. पण संकेत मिळत नव्हते. पाच वेळा पंतप्रधानांना भेटलो. मला राज्यसभेची जागा मिळेल, असे अपेक्षित होते. राज्यपालपद मिळेल, असे वाटले नव्हते. मी पंतप्रधानांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की, गडकरी, फडणवीस यांनी तुमच्यासाठी राज्यपालपदाची मागणी केली आहे तर तुम्ही राज्यसभा का मागत आहात. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. कारण गडकरी, फडणवीस यांनी मला हे सांगितलेच नव्हते, असे पुरोहित यांनी सांगताच सभागृहात हंशा पिकला. शेवटी एक दिवस फडणवीसांचा पहिला फोन आला. त्यांनी मी राज्यपाल झाल्याबद्दल अभिनंदन केले. नंतर लगेच गडकरींचा फोन आला, असे त्यांनी सांगितले.
विचारांच्या लढाईत अग्रेसर : मुख्यमंत्री फडणवीस
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुरोहित यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी ठसा उमटविला. त्यांनी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यासाठी त्यांना नुकसान सहन करावे लागले. मात्र, त्यांनी समझोता केला नाही. ते सदैव विचारांच्या लढाईत अग्रेसर राहिले. आपण राजकीय संस्कृती त्यांच्याकडून शिकलो, अशा शब्दात फडणवीस यांनी पुरोहित यांचा गौरव केला. खासगी कंपन्यांना कोळशाच्या खाणी भेटू नये साठी पुरोहित यांनी २० वर्षे न्यायालयीन लढा लढला. शेवटी ते सर्वोच्च न्यायालयात जिंकले. त्यामुळे आज देशाला दोन लाख कोटी मिळत आहेत. त्यांनी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या विरोधातही आवाज उठविला. शेवटी ईव्हीएमसोबत पेपर ट्रेल देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, असे सांगत पारदर्शिता हा त्यांच्या स्वभावातील महत्त्वाचा घटक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. १९९२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत माझ्या प्रचाराची सुरुवात पुरोहित यांच्याहस्ते झाली होती. प्रत्येक निवडणुकीत मला त्यांचे समर्थन रहायचे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आसामच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होईल : गडकरी
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, पुरोहित यांनी खासदार असताना अंतर्मनाचा आवाज ऐकून राममंदिराचा मुद्दा संसदेत मांडला. विदर्भ विकासासाठी ते सदैव आग्रही राहिले. आसाम हे महत्त्वाचे राज्य आहे. पूर्व भारताचा संबंध आहे. या भागातील लोकांमध्ये विकासात न्याय न मिळाल्याची भावना आहे. केंद्र सरकारने या भागाला आता प्राधान्य दिले असून एक लाख कोटींची कामे आपल्या मंत्रालयाने येथे सुरू केली आहेत. आतातर पुरोहित यांच्या रूपात आसामला क्रियाशील राज्यपाल मिळाले असून तेथील विकासाला एकप्रकारे डबल इंजिन लाभले आहे. त्यामुळे आसामचे विकासाचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. पुरोहित यांची राज्यपालपदी झालेली नियुक्ती ही नागपूर व विदर्भासाठी मानाची बाब आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मंत्र्यांच्या पत्रावरही प्रवेश नाही
पुरोहित यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेत गुणवत्तेलाच नेहमी प्राधान्य दिले, हे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यासमोर घडलेला एक प्रसंग सांगितला. एकदा पक्षाचे एक नेते तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांचे पत्र घेऊन प्रवेशासाठी आले होते. पुरोहित यांनी पत्र घेतले व फाईलमध्ये लावले. नंतर लगेच जोशी यांना फोन केला व आपण प्रवेशासाठी गुणवत्तेलाच प्राधान्य देत असल्याचे सांगत विनम्रपणे प्रवेश मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर आपल्या घरी भारतीय विद्या भवनमध्ये प्रवेशासाठी कुणीही भेटू नये, अशी पाटीच लावली, असे फडणवीस यांनी सांगताच सभागृहात एकच हंशा पिकला.
नॉन करप्ट कॅरेक्टर : न्या. सिरपूरकर
पुरोहित यांचा पिंड कार्यकर्त्याचा आहे. निगर्वी स्वभाव आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नॉन करप्ट कॅरेक्टर आहे. भ्रष्टाचाराशी दूरदूरचा संबंध नाही, अशा शब्दात माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी राज्यपाल पुरोहित यांचा गौरव केला. खऱ्या विदर्भवादी नेत्याचा आज सत्कार होत आहे, असेही ते म्हणाले. खा. अजय संचेती यांनी पुरोहित हे जसे बोलतात तसे करतात असे सांगत केंद्र सरकारने योग्य व्यक्तीला आसामचे राज्यपालपद दिल्याचे सांगितले. महापौर प्रवीण दटके म्हणाले, पुरोहित हे वंचितांच्या पाठीशी सदैव उभे राहिले. त्यांची राज्यपालपदी झालेली निवड ही नागपूरचा सन्मान वाढविणारी आहे.
५०० प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे आदेश घेऊन आलो : बावनकुळे
पालकमंत्री बावनकुळे यांनीही त्यांच्या आंदोलक जीवनातील एक आठवण सांगितली. ते म्हणाले, वीज प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याच्या मागणीसाठी १९९७ मध्ये आपण आंदोलन केले. तत्कालीन खा. बनवारीलाल पुरोहित हे आंदोलनाला भेट देण्यासाठी आले. आम्ही त्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी पुरोहित यांच्यासह आम्हाला तुरुंगात टाकले. ७ दिवस आम्ही एकाच कोठडीत होतो. शेवटी सरकार १५० प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे आदेश घेऊन तुरुंगात आले. आमच्यावरील गुन्हे मागे घेऊन आमची सुटका करण्यात आली. ते सात दिवस पुरोहित यांच्या रूपात मला ऋषी मुनींचा सहवास मिळाला, अशा शब्दात बावनकुळे यांनी त्यांचा गौरव केला. ज्या खात्याच्या विरोधात मी आंदोलन केले आज त्याच ऊर्जा खात्याचा मी मंत्री झालो. त्यामुळे या सत्कार सोहळ्याला येताना मी ५०० प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे आदेश घेऊन आलो आहे. पुढील सात दिवसात ते सर्व जण रुजू होतील, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली. राज्यपालपदाचे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत उर्वरित दीड हजार प्रकल्पग्रस्तांनाही नोकरी दिली जाईल, असा शब्दही त्यांनी पुरोहित यांना दिला.