लॉकडाऊन; दारू, सिगरेट, खर्रा सोडण्याची उत्तम संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 10:20 AM2020-03-30T10:20:55+5:302020-03-30T10:22:53+5:30
व्यसनाधीन व्यक्तिंसाठी हा काळ अतिशय कठीण झाला आहे. एकतर घरी राहून कंटाळवाणे होत असताना मादक पदार्थांची उपलब्धता कमी झाल्याने त्यांना अस्वस्थ होत आहे. पण ही अस्वस्थता चांगल्या परिणामांकडे जाऊ शकते, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आभा बंग यांनी व्यक्त केले आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारू, सिगरेट किंवा खर्रा ही व्यसने सोडण्याचा विचार तुम्ही करीत असाल पण ते शक्य होत नसेल तर अशांसाठी व्यसन सोडण्याची चांगली संधी लॉकडाऊनमुळे आली आहे. आपली थोडी आत्मशक्ती वापरून आणि थोड्या औषधोपचारांच्या मदतीने तुम्ही आपल्या व्यसनांना कायमचे सोडू शकता, असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १५ एप्रिलपर्यंत २१ दिवसाचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. परिस्थिती सुधारली नाही तर ही मुदत आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गर्दी रोखण्यासाठी पानठेले आणि बार, वाईनशॉप बंद ठेवले आहे. दुकाने बंद असली तरी काही वस्तू अजूनही मिळत आहे. ब्लॅकमध्ये दारू खर्रा दुप्पट किमतीने विकला जात आहे. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तिंसाठी हा काळ अतिशय कठीण झाला आहे. एकतर घरी राहून कंटाळवाणे होत असताना मादक पदार्थांची उपलब्धता कमी झाल्याने त्यांना अस्वस्थ होत आहे. पण ही अस्वस्थता चांगल्या परिणामांकडे जाऊ शकते, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आभा बंग यांनी व्यक्त केले आहे.
सामान्य व्यसनाधीन लोक आत्मशक्तीने आपले व्यसन सोडू शकतात, मात्र अति व्यसन असणाऱ्यासाठी एकाएकी व्यसन सोडणे कठीण बाब आहे. मादक पदार्थ सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांची अस्वस्थता आणि मानसिक त्रास वाढू शकतो. व्यसन सोडताना पहिला आठवडा किंवा १५ दिवस त्रासदायक ठरणारे आहे. त्यांना मायग्रेन किंवा मानसिक आजार उद्भवण्याची भीतीही डॉ. बंग यांनी व्यक्त केली. व्यसन एक मानसिक आजारच आहे आणि तो सोडताना त्रास होणे शक्य आहे. मात्र मादक पदार्थांची उपलब्धता कठीण झाल्याने व्यसन सोडण्याची एक मोठी संधीही ठरू शकतो. यामुळे व्यसनापासून कायमची मुक्तता करण्याची एक संधी म्हणून या लॉकडाऊनकडे बघावे, असे आवाहन डॉ. आभा बंग यांनी केले आहे.
व्यसनाधिनता मानसिक आजार
५० टक्के लोक अतिव्यसनाधिन गटात मोडतात. या परिस्थितीत त्यांची इच्छा वाढते, बेचैनी जाणवते, झोपेचा त्रास वाढतो, हाताला थरकाप सुटतो, पॅनिक अटॅक येण्याची शक्यता असते. पोटात गडबड, अॅसिडिटीचा त्रास याशिवाय चक्कर येणे आणि दिवसभराची सवय असलेल्यांना फीटसारखा आजारही होऊ शकतो. भांग किंवा गांजाची सवय असणाऱ्यांमध्ये लक्षात न राहणे, कानात आवाज ऐकू येणे, अंगावर कुणीतरी चालत असल्याचा भास होणे ही लक्षणे दिसून येतात. ही बाब कुटुंबाच्या लक्षात येणे गरजेचे आहे. मानसोपचार तज्ञांचा सल्ला आणि योग्य उपचार करणे आवश्यक असल्याचे डॉ. आभा बंग यांनी सांगितले. शारीरिक, आर्थिक, सामाजिक फायद्याचा विचार करावा. व्यसनाधिनता हा मानसिक आजार आहे आणि तो औषधोपचाराने बरा होऊ शकतो हा विश्वास त्यांनी दिला
व्यसनाधिनता हा मानसिक आजार आहे आणि तो सोडताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मनाचा विचार पक्का करा. काही त्रास जाणवल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्या. सुरुवातीचे आठ दिवस थोडा त्रास होईल पण नंतर तुम्ही व्यसनमुक्त व्हाल.
- डॉ. आभा बंग, मानसोपचार तज्ज्ञ