नागनदी सौंदर्यीकरणाचा १६०० कोटींचा बृहत् आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:24 PM2018-12-13T23:24:11+5:302018-12-13T23:24:49+5:30
नागपूर शहरातील नागनदीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनासाठी फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी(एएफडी)ने पुढाकार घेतला आहे. एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट यांनी गुरुवारी नागनदीच्या दर्शनी भागाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाचा १६०० कोटींचा बृहत् आराखडा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सुपूर्द केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील नागनदीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनासाठी फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी(एएफडी)ने पुढाकार घेतला आहे. एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट यांनी गुरुवारी नागनदीच्या दर्शनी भागाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाचा १६०० कोटींचा बृहत् आराखडा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सुपूर्द केला.
महापालिकेने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून नद्यांच्या संबंधात दोन प्रकल्प हाती घेतलेले आहेत. पहिला प्रकल्प नागनदी प्रदूषण निर्मूलनाचा आहे. नागनदीमध्ये वाहणारे सांडपाणी थांबवून त्यावर प्रक्रिया करून नदीमध्ये पुन्हा सोडणे तसेच उत्तर सिवरेज झोन व मध्य सिवरेज झोनअंतर्गत सांडपाण्याची निर्मिती व निस्सारणासंबंधित पहिला प्रकल्प आहे. यासाठी केंद्र शासनाद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय वित्तीय व्यवस्थापनाकरिता जिका (जपान) संस्थेद्वारे राज्य व केंद्र शासनाला वित्तीय मदत मंजुरी प्राप्त आहे. १२५२.३३ कोटीचा हा प्रकल्प आहे.
यासंदर्भात १० ते १३ डिसेंबरदरम्यान एएफडी चमूने नागपूर महापालिकेला भेट दिली. शहरातील वनामती येथे प्रकल्पासंबंधी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिका, महामेट्रो, व्हीएनआयटी, नीरी, सामाजिक संस्था, नागपूर सुधार प्रन्यास, वन विभाग, कृषी विद्यापीठ, स्मार्ट सिटी, एनईएसएल व इतर भागधारक यांना आमंत्रित करण्यात आले. प्रकल्पाची वेगवेगळ्या स्तरावर गट तयार करून चर्चा करण्यात आली. पूर व्यवस्थापन, गतिशीलता, पुनर्वसन, जैवविविधता, पर्यावरण व वेगवेगळ्या विभागाचे समन्वयन याबाबत चर्चा करून, प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामाचे प्राधान्य ठरविण्यात आले.
मनपाचे नदी चमू प्रमुख व तांत्रिक सल्लागार मो. इसराईल यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. नदी व सरोवरे प्रकल्प अधिकारी मो. शफीक, संदीप लोखंडे, डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते यांनी प्रामुख्याने कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला. एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट, सिबीला जान्सिक, पी.के. दास असोसिएशनचे समर्थ दास, मिसाका हेत्तीयारच्ची, प्रियंका जैन आदी उपस्थित होेते. ब्लेंझ वार्लेट यांनी संचालन करून नियोजनाबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली.