खासगी जमिनीवरील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:14+5:302021-07-26T04:07:14+5:30
मालकीपट्टे मिळणार : जमीन आरक्षण फेरबदलाची अधिसूचना जारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात खासगी जमिनीवर ...
मालकीपट्टे मिळणार : जमीन आरक्षण फेरबदलाची अधिसूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात खासगी जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जमिनीच्या आरक्षण फेरबदलाची जाहीर सूचना महापालिकेच्या नगररचना विभागाने काढली आहे. राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर पट्टेवाटपाला सुरुवात होणार आहे.
केंद्र सरकार सर्वांसाठी घरे-२०२२ योजना राबवीत आहे. या योजनेचा झोपडपट्टीधारकांना लाभ मिळावा यासाठी मालकी पट्टे वाटप करण्याचे धोरण राज्य सरकारने अमलात आणले आहे. ११ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयात प्रक्रिया नमूद केली आहे. झोपडपट्ट्यांखालील जमिनीच्या फेरबदलाचा प्रस्ताव झाल्यानंतर हस्तांतरण विकास हक्काच्या (टीडीआर) माध्यमातून ती जमीन संपादित करून सर्व तरतुदींची पूर्तता झाल्यावर शासन मान्यतेने पट्टे वाटपाची कार्यवाही करावयाची आहे.
शहराच्या मंजूर विकास योजनेतील अस्तित्वातील खासगी जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांची जमीन बेघरांसाठी घरे अथवा जनतेसाठी घरे या प्रयोजनासाठी आरक्षित करण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याबाबतचा ठराव मनपाच्या आमसभेत प्रथम मंजूर होणे आवश्यक आहे. २० जानेवारी २०२१ रोजीच्या आमसभेत याबाबतचा ठराव मंजूर झाला होता. परंतु, यावरील जाहीर सूचना ५ महिने प्रकाशितच झाली नाही. अखेर नगररचना विभागाने मागील महिन्यात २३ जून २०२१ रोजी ही जाहीर सूचना काढली.
हरकती व आक्षेप नोंदविण्यासाठीची एक महिन्याची मुदत २३ जुलैला संपली. आता हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतरच पुढील कार्यवाही, जमीन संपादन व मालकी पट्टे वाटप होणार आहे. मनपाने आता पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक, डॉ. दिलीप तांबटकर, राजकुमार वंजारी, कवडुलाल नागपुरे, रामदास उईके, विमल बुलबुले, विजय पहुरकर, राजकुमार तलवारे व शैलेंद्र वासनिक यांनी केलेली आहे.
....
७४६८ झोपडपट्टीधारकांना लाभ
नागपूर शहरातील २८ घोषित झोपडपट्ट्या खासगी जमिनीवर वसलेल्या आहेत. या वस्त्यांमधील ७४६८ घरांच्या सर्वेक्षणाचे कामही झालेले आहे. या सर्वांना मालकीपट्टे धोरणाचा लाभ मिळू शकणार आहे. मात्र यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
...
या आहेत खासगी जमिनीवरील झोपडपट्ट्या
रामटेकेनगर, रहाटेनगर, महात्मा फुलेनगर, राजीवनगर, प्रियंकावाडी, सहकारनगर, सोमलवाडा (दक्षिण-पश्चिम), जगदीशनगर, लाला गार्डन (पश्चिम), आदर्शनगर, शिवणकरनगर, शांतीनगर-२, शांतीनगर-४ (पूर्व), मोमिनपुरा-तकिया, चिंचपुरा (मध्य), सावित्रीबाई फुलेनगर, रमाईनगर, बिडीपेठ (दक्षिण), नारी गाव, भदंत आनंद कोसल्यायणनगर, सोनारटोली, कुंदनलाल गुप्ता नगर, मानवनगर, राहुलनगर, आझादनगर, भीमवाडी, जरीपटका (उत्तर नागपूर) या वस्त्यांचा समावेश आहे.
...
प्रशासनाने कालापव्यय टाळावा
जमीन आरक्षण फेरबदलाचा ठराव आमसभेत मंजूर करण्यासाठी मनपाने १४ महिने लावले. त्यात २० जानेवारी २०२१ रोजी सभागृहात ठराव मंजूर झाल्यानंतर त्यावरील जाहीर सूचना ५ महिन्यांनंतर २३ जून २०२१ ला काढण्यात आली. प्रशासनाने यात मोठा कालापव्यय केला. आता तरी जमीन फेरबदलाच्या प्रस्तावावर राज्य शासनाने अंतिम आदेश जलद काढून या झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे द्यावेत.
-अनिल वासनिक, संयोजक, शहर विकास मंच