लोभ नडला अन् तो कोठडीत पोहचला
By नरेश डोंगरे | Published: July 14, 2023 01:41 PM2023-07-14T13:41:27+5:302023-07-14T13:46:53+5:30
मौल्यवान ऐवज असलेली बॅग चोरून नेली : सीसीटीव्हीने त्याची चुगली केली
नरेश डोंगरे
नागपूर : विरंगुळा म्हणून तो रेल्वेस्थानकावर आला. फलाट क्रमांक ८ वर सहज फिरत असताना त्याला बाकड्यावर एका बॅग दिसली. त्याच्यात लालसा निर्माण झाली अन् ती बॅग उचलून तो सरळ निघून गेला. दरम्यान, आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरटा त्यात दिसला. त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. शेख रज्जाक (वय ४४, रा. लोहरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख २० हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग जप्त केली.
धवल अतकरे असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. त्यांना आझाद हिंद एक्सप्रेसने पुण्याला जायचे होते. ते नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर आले. गाडीच्या प्रतिक्षेत बाकड्यावर बसले. दरम्यान २.३० ते ३ वाजेच्या सुमारास गाडी आली. त्यांनी बॅग तेथेच ठेवली अन् गाडीची खात्री करायला गेले. त्याच वेळी आरोपी शेख रज्जाक तेथे आला. बॅग पाहून त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. बॅग जवळ कोणी नसल्याने त्याने बॅग उचलली आणि निघून गेला.
अतकरे बॅग घेण्यासाठी परतले तेव्हा ती जागेवर नव्हती. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, बॅग दिसली नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये शेख रज्जाक बॅग उचलून नेताना दिसला. पोलिसांनी शेख रज्जाकची माहिती गोळा केली. तो संत्रा मार्केट परिसरात पुन्हा येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सापळा रचून पोलिसांनी त्याला गुरुवारी पकडले.
म्हणून बॅग उचलून नेली
शेख रज्जाक हा चोरी करण्याच्या सवईचा नाही. कुठल्यातरी कारणावरून तनावात असल्याने तो घराबाहेर पडला. रेल्वे स्थानकावर आला. त्याला बॅग दिसली. त्यामुळे त्याच्या मनात चलबिचल निर्माण झाली. बॅगजवळ कुणी नसल्याने लोभापोटी त्याने ती चोरून नेली अन् आता पोलिसांच्या कोठडीत पोहचला. आता पोलिसांना माहिती देताना बॅग बेवारस दिसली म्हणून उचलून नेण्याची मखलाशी तो करत आहे.