'त्या' पुराणवृक्षाला वाचविण्यासाठी राज्यभरातून सरसावले वृक्षप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:42 PM2021-12-02T17:42:56+5:302021-12-02T17:55:40+5:30
सीताबर्डी परिसरातील २०८ वर्षे जुन्या पुराणवृक्षाला ताेडण्यात येत असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. महापालिकेने झाड ताेडण्याबाबत कुणाला हरकत असल्यास आक्षेप नाेंदविण्याचे आवाहन केले होते. यानंतर उद्यान विभागाच्या मेलवर अनेक वृक्षप्रेमींनी आक्षेप नाेंदविला आहे.
नागपूर : सीताबर्डी परिसरातील २०८ वर्षे जुन्या पुराणवृक्षाला ताेडण्यात येत असल्याची ‘लाेकमत’मध्ये प्रकाशित झालेली बातमी वणव्यासारखी पसरली असून, हे झाड वाचविण्यासाठी राज्यभरातून आक्षेप नाेंदविण्यात येत आहेत. हे झाड ताेडण्यात येऊ नये व महापालिकेने वारसावृक्ष म्हणून त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून हाेत आहे.
सीताबर्डी परिसरातील भिडे मार्गावर बुटी वाड्याला लागून हे पिंपळाचे पुरातन झाड आहे. घन:श्याम पुराेहित या बिल्डरद्वारे येथे निवासी इमारत बांधण्यासाठी अडथळा हाेत असलेले हे झाड ताेडण्याची परवानगी मनपाच्या उद्यान विभागाला मागितली हाेती. त्यानुसार उद्यान विभागाने जाहिरातीद्वारे झाड ताेडण्याबाबत सूचना व आक्षेप मागविले हाेते.
‘लाेकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच पर्यावरणप्रेमी झाड वाचविण्यासाठी सरसावले आहेत. हे ऐतिहासिक झाड ताेडण्याऐवजी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी हाेत आहे. नर्सिंग काॅलेजच्या संचालिका नीलिमा हाराेडे यांनी उद्यान अधीक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देऊन, झाड ताेडण्यावर आक्षेप घेतला आहे. आजच्या घडीला वास्तुशिल्पाचे अनेक प्रयाेग केले जातात. तेव्हा झाड वाचवूनही इमारतीचे बांधकाम करता येते, असे सांगत त्यांनी वृक्ष संवर्धनाला महत्त्व दिले आहे.
नागपूरच नाही, तर पुणे, मुंबई, काेल्हापूर आदी शहरांतील वृक्षप्रेमींनीही नागपूर मनपाच्या ईमेलवर पुरातन वृक्ष ताेडण्यावर आक्षेप नाेंदविला आहे. यातून वृक्ष संवर्धनाबाबत लाेकांमध्ये असलेली जागृती दिसून येत आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी या जागेवर भेटी देऊन ऐतिहासिक ठेवा वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
माेबदला मिळाल्यास जागा साेडणार : पुराेहित
दरम्यान, जमीनमालक घन:श्याम पुराेहित यांनी झाड वाचविण्यासाठी हाेत असलेला विराेध पाहता, माेबदला मिळाल्यास ही जागा साेडण्याची तयारी दर्शविली आहे. शासनाने, महापालिकेने किंवा इतर कुणीही रेडिरेकनरच्या दरानुसार जमिनीचा माेबदला दिल्यास आपण या जागेची मालकी साेडून देऊ, असे त्यांनी सांगितले आहे.