ग्रीन बिल्डिंगला मालमत्ता करात मिळणार २० टक्के सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:05 IST2025-03-24T17:04:17+5:302025-03-24T17:05:25+5:30

महानगरपालिकेची घोषणा : अर्थसंकल्पात केली विशेष तरतूद

Green buildings will get 20 percent discount in property tax | ग्रीन बिल्डिंगला मालमत्ता करात मिळणार २० टक्के सवलत

Green buildings will get 20 percent discount in property tax

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
महापालिकेतर्फे वाढते प्रदूषण आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग संकल्पनेस प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र प्राप्त इमारतींना मालमत्ता करात २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.


सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मनपाला मालमत्ता करापासून ३५० कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. मनपातर्फे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी आणि  वाढते तापमान रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या 'मनपा'तर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या इमारत मालकांना मालमत्ता करातील सामान्य करातून १० सूट देत आहे. आता या चारही वैशिष्ट्यांसह ग्रीन बिल्डिंग बांधण्याची चालना मिळणे व बांधकाम व्यवसाय प्रोत्साहन मिळण्याकरिता इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने 'प्लॅटिनम ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र' दिलेल्या मालमत्तेसाठी १० टक्के अधिक सूट देण्यात येणार आहे.


कायद्याअंतर्गत १२ सेवा ऑनलाइन
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नामांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एसएमएसद्वारे माहिती मिळते. तसेच, थकबाकीदार मालमत्ताधारकांना मराठी आणि इंग्रजीत संदेश पाठवून माहिती दिली जाते.


प्लॅटिनम ग्रीन बिल्डिंग : १० टक्के अधिक
सवलत (एकूण २० टक्के)
गोल्डन ग्रीन बिल्डिंग : ७.५ टक्के अधिक सवलत (एकूण १७.५ टक्के)
सिल्व्हर ग्रीन बिल्डिंग : ५ टक्के अधिक सवलत (एकूण १५ टक्के)
महापालिकेच्या या निर्णयामुळे पर्यावरणपूरक बांधकामांना चालना मिळेल आणि नागपूरच्या पर्यावरणीय संतुलनास हातभार लागेल.


मालमत्ता कर संकलनासाठी तंत्रज्ञानाचा वापर

  • महापालिकेने कर संकलन आणि मालमत्ता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
  • जिओसिव्हिक अॅप : जीआयएस सर्वेक्षणाद्वारे ६.६८ लाख मालमत्तांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
  • स्पीड पोस्ट सेवा : नवीन आणि जुन्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची देयके वेळेवर पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्टद्वारे बिल पाठवले जात आहे. आतापर्यंत २.८२ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना बिले वितरित करण्यात आली आहेत.
  • टॅक्स मॉनिटरिंग अॅप : मालमत्तेत होणाऱ्या बदलांनुसार कर अद्ययावत ठेवण्यासाठी महापालिका हे अॅप वापरत आहे.


ग्रीन बिल्डिंगसाठी कर सवलतीचे निकष
शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या इमारतींना सध्या १० टक्के सवलत दिली जाते. याशिवाय, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वारे प्रमाणित ग्रीन बिल्डिंगसाठी अतिरिक्त सवलत मिळणार आहे.

Web Title: Green buildings will get 20 percent discount in property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर