ग्रीन कॉरिडोरमुळे बसेल वायुप्रदूषणाला आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:12+5:302021-01-15T04:08:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील वायुप्रदूषणाला आळा बसावा शहरातील रस्ता दुभाजकावर ग्रीन कॉरिडोर निर्माण करण्याची योजना तयार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील वायुप्रदूषणाला आळा बसावा शहरातील रस्ता दुभाजकावर ग्रीन कॉरिडोर निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून एनसीएपी उपक्रमांतर्गत यासाठी निधी मिळाला आहे. यामुळे बिकट आर्थिक स्थितीचा सामना करीत असलेल्या महापालिकेला थोडा दिलासा मिळाला आहे.
एक कोटी ८९ लाख ८० हजार ३५९ रुपयाचा प्रस्ताव मनपाच्या उद्यान विभागातर्फे तयार करण्यात आला आहे. शहरातील आठ झोनमधील रस्ता दुभाजकावर हिरवळ लावली जाणार आहे. वायुप्रदूषणाला आळा बसावा यासाठी झाडे लावली जाणार आहेत. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. याला मंजुरी मिळण्याची आशा आहे. मनपातर्फे वायुप्रदूषण अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.
लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनच्या रस्ते दुभाजकावर ग्रीन कॉरिडोरसाठी ३८ लाख ७३ हजार ९३४ रुपये, हनुमाननगर व धंतोली झोनसाठी ४६ लाख २७ हजार ५७ रुपये, नेहरूनगर झोनसाठी ५२ लाख ९३ हजार १८८ रुपये, मंगळवारी झोनसाठी ५१ लाख ३६ हजार १७९ रुपयाचा प्रस्ताव तयार केला आहे. नेहरूनगर झोनमधील रस्त्यावर सर्वाधिक हिरवळ निर्माण करणार आहे. गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमधील रस्ते जास्त रुंद नाही. तसेच रस्ता दुभाजकही व्यवस्थित नाही. यामुळे या झोनचा यात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र या दोन झोनमध्ये सर्वाधिक प्रदूषण आहे.
...............
५० सामुदायिक जल शुद्धीकरण मशीनला ब्रेक
नगरोत्थान योजनेंर्गत नागपूर शहरात १ हजार प्रति तास क्षमतेचे ५० सामुदायिक जल शुद्धीकरण मशीन (आरओ व यूपी) लावण्याची योजना होती. ११.०९ कोटी रुपयाच्या या योजनेला १४ ऑगस्ट २०१९ रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. ५ डिसेंबर २०१९ ला हा निधी खर्च करण्याला राज्य सरकारने निर्बंध घातले. यामुळे प्रत्येक झोनमधील प्रस्तावित ५० सामुदायिक जल शुद्धीकरण मशीनला ब्रेक लागला.