इंग्रजी माध्यमांच्या ६ शाळांना हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:11 AM2021-02-18T04:11:43+5:302021-02-18T04:11:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. परिणामी, मनपाच्या शाळांमधील पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी व मनपा शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक अशा सहा इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
मनपाने शहरात मराठी, हिंदी व उर्दू प्रमाणेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्या, अशी पालकांची मागणी होती, तसेच काळाची गरज लक्षात घेता सहा इंग्रजी शाळा सुरू करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी दिली.
या शाळांसाठी मनपाने जागा शोधल्या आहेत. या शाळांसाठी आकांक्षा फाउंडेशनचे तांत्रिक व आर्थिक सहकार्य लाभणार आहे. फाउंडेशन शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन खर्चाच्या प्रथम वर्षी ३० टक्के, दुसऱ्या वर्षी ३५ टक्के, तिसऱ्या वर्षी ४० टक्के, चवथ्या वर्षापासून पुढे सामंजस्य करार ४५ टक्के खर्च करणार आहे. उर्वरित खर्च मनपा करणार आहे, तसेच मनपा विद्युत, पाणी, शाळा इमारत निर्माण व देखभाल दुरुस्ती, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, शालेय सुरक्षा, स्वच्छता अशा पायाभूत सुविधांवरील खर्च करणार आहे.
...
विधानसभा निहाय इंग्रजी शाळा
उत्तर नागपूर- राणी दुर्गावती प्राथमिक शाळा
पूर्व नागपूर- बाभुळबन मराठी प्राथमिक शाळा
दक्षिण-पश्चिम - स्व. बाबुरावजी बोबडे मराठी प्राथमिक शाळा्र
पश्चिम नागपूर - रामनगर मराठी मराठी प्राथमिक शाळा
दक्षिण नागपूर - रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळा
मध्य नागपूर- स्व. गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळा