आरटीओ ते कॅम्पस मार्गावरील उड्डाणपुलाला हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:36+5:302021-04-02T04:09:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - उपराजधानीत आणखी एक उड्डाणपूल उभारण्याला हिरवी झेंडी मिळाली आहे. नागपूर विद्यापीठ कॅम्पस परिसर ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - उपराजधानीत आणखी एक उड्डाणपूल उभारण्याला हिरवी झेंडी मिळाली आहे. नागपूर विद्यापीठ कॅम्पस परिसर ते आरटीओ या मार्गावर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या अंदाजपत्रकात त्याला मंजुरी मिळाली आहे. ४७८ कोटींचा खर्च करून हा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयांतर्गत नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील २,८०० कोटींच्या महामार्गांना मंजुरी दिली. यात नागपुरातील या उड्डाणपुलाचादेखील समावेश आहे.
या पुलासंदर्भात काही महिन्यांअगोदर घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याला अधिकृत मंजुरी मिळाली नव्हती. अखेर गुुरुवारी मंत्रालयाची या पुलाला मंजुरी मिळाली. यासोबतच वाडी-एमआयडीसी जंक्शनलादेखील चारपदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. आरटीओ ते विद्यापीठ कॅम्पस मार्गावरील हा उड्डाणपूल हा वाडी आणि एमआयडीसी जाणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. हा उड्डाणपूल चारपदरी राहणार असून, लवकरच बांधकामाच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील या प्रकल्पांना मिळाली मंजुरी
प्रकल्प - खर्च
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील तिरोडा गोंदिया या २८ किमीच्या मार्गाला मंजुरी - २८८.१३ कोटी
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफवर परळी ते गंगाखेड या मार्ग सुधारणा : २४४.४४ कोटी
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील आमगाव गोंदिया महामार्ग - २३९.२४ कोटी
- नांदेडजवळील येसगी गावाजवळ मंजिरा नदीवरील पूल - १८८ कोटी
- कोल्हापूर जिल्ह्यातील तारेरे गगनबावडा ते कोल्हापूर महामार्ग- १६७ कोटी
- राष्ट्रीय महामार्ग ७५२ वरील तिरोडा गोंदिया महामार्ग -२२८ कोटी
- गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३५३ चे बांधकाम व १६ पूल - २८२ कोटी
- गुहागर-चिपळूण महामार्ग - १७१ कोटी
- जळगाव-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड महामार्ग सुधारणा - २५२ कोटी