ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ग्रामस्तरावर ग्रीन जीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 08:33 PM2018-01-13T20:33:10+5:302018-01-13T20:36:39+5:30
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी खेळाचे मैदान असलेल्या ग्रामपंचायतीला सात लाख खर्चापर्यंत ग्रीन जीम देऊन क्रीडांगण विकासालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी खेळाचे मैदान असलेल्या ग्रामपंचायतीला सात लाख खर्चापर्यंत ग्रीन जीम देऊन क्रीडांगण विकासालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
विभागीय क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त खेळाडूंना क्रीडा साहित्यांचे वाटप तसेच क्रीडांगण विकास निधीचे वाटप पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे विजय डांगरे, महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती नागेश शहारे, नगरसेविका आभा पांडे, संध्या इंगळे, अविनाश दोसटवार, सचिन सुरेश घोडे, शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड उपस्थित होते.
ग्रामीण भागात खेळाडूंना व्यायामासह विविध खेळामध्ये सहभाग घेता यावा यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून क्रीडांगण विकास अनुदानअंतर्गत क्रीडांगणाची सुधारणा, संरक्षित भिंत बांधणे, तसेच २०० मीटरचा धाव मार्ग तयार करणे आणि आवश्यक सुविधांसाठी प्रत्येकी सात लक्ष रुपये अनुदान स्वरुपात देण्यात येते असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ग्र्रामीण भागातील १६० ग्रामपंचायतींना प्रत्येकी सात लक्ष रुपयाप्रमाणे क्रीडांगण विकासासाठी निधी देण्यात आला असून १०३ व्यायमशाळांनासुध्दा आवश्यक खेळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी निधीचे धनादेश देण्यात आले.
हर्षल झाडे यांना सर्वोत्कृष्ट रायफलचे वितरण
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नामवंत खेळाडू हर्षल झाडे यांना जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्वोत्कृष्ट रायफल पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच दोन लक्ष रुपयाचे बॉक्सिंग या खेळाचे साहित्य पकंज नलेंद्रवार यांना देण्यात आले. व्यायमशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत व्यायामशाळेचे बांधकाम व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी सात लक्ष रुपयाच्या अनुदानाचे धनादेश यावेळी वितरित करण्यात आले.