सूर्याच्या नाही, ‘एलईडी’च्या झगमगाटात पिकेल शेती!
By जितेंद्र ढवळे | Published: September 4, 2023 03:37 PM2023-09-04T15:37:09+5:302023-09-04T15:38:30+5:30
ग्रीन हाउस आशेचा किरण : विद्यापीठ कॅम्पस अन् समुद्रपूरमध्ये होतोय प्रयोग
जितेंद्र ढवळे
नागपूर : सूर्यदेवाचा अभ्यास करायला भारताचे आदित्य एल-१ यान निघाले आहे! मात्र सूर्याचे अवंलबित्व कमी करून एलईडी लाइटच्या बळावर शेती करता येईल का? यातून दर्जेदार उत्पादन घेता येईल का, यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आणि समुद्रपूर येथील विद्या विकास आर्ट ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये संशोधन सुरू आहे.
‘एलईडी बेस्ड ग्रीन हाउस फॉर प्लांट कल्टिव्हेशन’ असे या संकल्पनेचे नाव आहे. एलईडी बेस ग्रीन हाउस ही संकल्पना जगासाठी नवी नाही! मात्र विदर्भात याचा वापर व्हावा. दुष्काळ आणि नापिकीच्या झळा सोसणारा येथील शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून अत्यंत कमी खर्चात एलईडी बेस्ड ग्रीन हाउस तयार करून शेती करता येईल का, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोबळे आणि समुद्रपूरच्या विद्या विकास आर्ट ॲण्ड सायन्स कॉलेजच्या बॉटनी विभागाच्या प्रमुख डॉ. नयना शिरभाते गेल्या काही दिवसांपासून यावर संशोधन करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता यशही आले आहे.
ग्रीन हाउस म्हणजे काय?
- ग्रीन हाउस शेतीत आपण हंगामी पिकांसोबत बिगरहंगामी पिके घेऊ शकतो. हे वर्षभर पिकाची वाढ आणि फळांचे उत्पादन समृद्ध करण्यास मदत करते.
- हे पिकांचे संरक्षण करण्यास आणि त्यांना कीड तसेच रोगांपासून मुक्त ठेवण्यास आणि वाढ कायम ठेवण्यास मदत करते. विशेष म्हणजे या शेतीसाठी पाणी कमी लागते.
यात एलईडीचा वापर कसा होणार?
- एलईडी ग्रोथ लाइट्स रोपांना ग्रीन हाउसमध्ये सूर्यप्रकाशाचे अनुकरण प्रदान करतात. हे दिवे विशिष्ट प्रकाश स्पेक्ट्रम (विशेषत: लाल आणि निळे) उत्सर्जित करतात जे वनस्पतींच्या वाढीवर परिणाम करतात.
- एलईडी हा ग्रीन हाउससाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण तो वनस्पतींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापक कस्टमायझेशन ऑफर करतो. कमी उष्णता उत्सर्जित करतो.
कोणता रंग काय करतो?
ब्लू एलईडी (निळा रंग): ब्लू एलईडी हा झाडांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतो.
रेड एलईडी (लाल रंग) : रेड एलईडीमुळे रोपांची वाढ होते.
फार रेड एलईडी : फार रेड एलईडीमुळे झाडांना फळ धारणा होण्यास मदत होते.
एलईडी बेस्ड ग्रीन हाउसमध्ये औषधी वनस्पतीचे (मेडिकल प्लांट) संगोपन सहज शक्य आहे. इतकेच काय ज्या पिकांचे किंवा फळांचे उत्पादन आपल्याकडे होत नाही ते यातून साध्य करता येईल. कमी खर्चात हे युनिट तयार करता येते. यात ड्रिप वॉटर सिस्टीमचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा व्यापक स्वरूपात वापर झाल्यास शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येतील. आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. डिसेंबरमध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यात येईल.
- डॉ. संजय ढोबळे, शास्त्रज्ञ