सोशल डिस्टन्सिंग पाळत नागपुरात बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:09 PM2020-04-14T22:09:38+5:302020-04-14T22:13:12+5:30

शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. पण यंदा कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करण्यात आले.

Greet BabaSaheb for following the Social Distance | सोशल डिस्टन्सिंग पाळत नागपुरात बाबासाहेबांना अभिवादन

सोशल डिस्टन्सिंग पाळत नागपुरात बाबासाहेबांना अभिवादन

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांनी घरीच लावला संविधानाचा दिवा : कोरोनामुक्तीसाठी घेतली बुद्धवंदना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. पण यंदा कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, आदरांजली अर्पण करण्यात आली. काहींनी संविधानाचा दिवा लावून आदरांजली वाहिली. अनेकांनी यानिमित्त बाबासाहेबांच्या ग्रंथांचे वाचन केले. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून बुद्धवंदना घेण्यात आली. कुठलाही बडेजावपणा न करता सोशल डिस्टन्सिंग पाळत शासकीय कार्यालये, राजकीय पक्षांची कार्यालये, सामाजिक संस्था यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यानिमित्त काही संस्थांनी गरजूंनाही मदत केली.
विभागीय आयुक्त कार्यालय


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, तहसीलदार प्रताप वाघमारे, अरविंद सेलोकर तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, तहसीलदार सुधाकर इंगळे तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महापालिका

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीनिमित्त मनपा मुख्यालयामध्ये महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, आयुक्त तुकाराम मुंढे व विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून नगरीतर्फे अभिवादन केले.अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे मनपात आणि शहरात कुठेही सार्वजनिक कार्यक्रम न करता सामाजिक अंतर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी इतिहासात प्रथमच नागपूरची पवित्र दीक्षाभूमी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या आवाहनाला आंबेडकरी जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि आपापल्या घरी पुष्प अर्पण करून दोन दिवे या महामानवासाठी प्रज्वलित करून अभिवादन केले. सकाळी दीक्षाभूमी स्तूपात भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थिकलशाला स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, सुधीर फुलझेले व सोशल डिस्टन्सिंग ठेवत मोजक्या भिक्खू संघाने बुद्ध वंदना व २२ प्रतिज्ञांचे वाचन करीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर दीक्षाभूमीचे दार बंद करण्यात आले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी आपल्या घरी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत दीप प्रज्वलित करून अभिवादन केले.

Web Title: Greet BabaSaheb for following the Social Distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.