जयघोषाने अंबर गर्जले
By admin | Published: September 16, 2016 03:10 AM2016-09-16T03:10:33+5:302016-09-16T03:10:33+5:30
दहा दिवस घरी मुक्कामाला आलेल्या व आपल्या पावन सानिध्याने भाविकांच्या मनात नवे चैतन्य
बाप्पांना निरोप : तलावांवर भाविकांची गर्दी, गुलालाची उधळण अन् तरुणाईचा जल्लोष
नागपूर : दहा दिवस घरी मुक्कामाला आलेल्या व आपल्या पावन सानिध्याने भाविकांच्या मनात नवे चैतन्य पेरणाऱ्या बाप्पांना आज गुरुवारी अनंत चतुर्दशीला नागपूरकरांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. शहरातील गांधीसागर, फुटाळा, सक्करदरा, नाईक तलाव,पोलीस लाईन तलावाच्या काठावर धूपबत्तीचा स्वर्गीय दरवळ अन् आरतीच्या गजरात बाप्पांचे मोहक रूप डोळ्यात साठवून मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् तरुणाईचा जल्लोष पाहण्यासारखा होता. शहरातील जलाशयांकडे जाणाऱ्या प्रमुख विसर्जन मार्गांना तर जणू जत्रेचे स्वरूप आले होते. घरगुती व सार्वजनिक गणपतींना तलावाकडे घेऊन येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा सर्वत्र दिसत होत्या. नागपुरातील फुटाळा तलावावर सकाळी ९ वाजतापासून सर्वप्रथम घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. कुणी सायकलवर, कुणी सायकलरिक्षामध्ये बसून तर कुणी कारमधून बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन आले होते.
ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने अवघे शहर दणाणून गेले. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा गर्जनेत आबालवृद्धांच्या उत्साहाने जणू भक्तीचा महापूर ओसंडूून वाहत होता. लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर तो गावाला जात असल्याने अखेरच्या सेल्फीसाठी अनेक भक्तांची धडपड सुरू होती. काहींनी बाप्पाच्या आरतीच्या वेळी तर काहींनी अगदी सूर्यास्ताच्या क्षणी किनाऱ्यावर अखेरचा निरोप देताना सेल्फी स्टीक घेऊन तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला.
रिद्धी-सिद्धीसह बुद्धीचा देवता असलेल्या बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरला. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करते, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली. बाप्पाला अखेरचा निरोप देऊन विघ्न दूर कर बाप्पा, अशी मनोकामना करीत भाविकांनी परतीचा मार्ग धरला.
मोजक्या पण जागरूक नागरिकांचा प्रतिसाद
४गणेश विसर्जनप्रसंगी पर्यावरण सुरक्षेच्यादृष्टीने थोडे निराश करणारे वातावरण आज शहरातील सर्वच तलावांवर दिसले. पण, यातही काही सन्मानजनक अपवाद होतेच. पर्यावरणप्रेमी संस्था, महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मोजक्या पण सामाजिक कर्तव्याप्रति जागरूक नागरिकांनी तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन न करता पर्यायी कुंडांत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. मूर्तीसोबतचे निर्माल्यही आवर्जून स्वयंसेवी संस्थांच्या हवाली केले.