१४ एप्रिलला महामानवाला ‘डिजीटल माध्यमातून’ करणार अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:21 AM2020-04-11T09:21:29+5:302020-04-11T09:22:22+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती येत्या १४ एप्रिल रोजी आहे. ही जयंती नेहमीप्रमाणे उत्साही स्वरूपात साजरी करणार नाही हे आता निश्चित झाले आहे. मात्र डिजीटल युगात डिजीटल माध्यमाचा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना समाजबांधवांनी शोधली आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती येत्या १४ एप्रिल रोजी आहे. या भारत उद्धारकाच्या जयंतीचा उत्साह समाजबांधवांमध्ये असतो. मात्र यावेळी देशावर ओढवलेली परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. अशावेळी मी प्रथम भारतीय व अंतिमत: भारतीय मानणाऱ्या या भारतरत्नाचे अनुयायी ही जयंती नेहमीप्रमाणे उत्साही स्वरूपात साजरी करणार नाही हे आता निश्चित झाले आहे. मात्र डिजीटल युगात डिजीटल माध्यमाचा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना समाजबांधवांनी शोधली आहे. बाहेर पडण्याऐवजी घरातूनच डिजीटल माध्यमातून महामानवाच्या विचारांचा जागर केला जाणार असून विविध संस्था, संघटनांनी त्यासाठी उपक्रमही चालविले आहेत.
दलित, शोषित, वंचित व अस्पृश्य समाजाला ताठ मानेने जगायला लावणारे उद्धारक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हटली की समाज बांधवांमध्ये वेगळा उत्साह संचारला असतो. कुठे संविधान मॅरेथान, मेणबत्ती घेउन रॅली तर कुणी वाजतगाजत मिरवणूकी काढतो. नागपूर शहर तर जयंतीच्या उत्साहात रंगलेले असते. दीक्षाभूमी आणि संविधान चौकात तर अनुयायांची अभिवादनासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत रेलचेल चाललेली असते. मात्र यावर्षी नेहमीच्या उत्साहात जयंती सोहळा साजरा करणे शक्य नाही. कोरोना महामारीने जगाला विळख्यात घेतले आहे आणि आपला देशही या संकटाचा सामना करीत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. घरात राहणे व सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे झाले असून सार्वजनिक कार्यक्रम घेणे धोकादायक झाले आहे. अशावेळी घरी राहूनच जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन सर्वच बौद्ध संघटनांनी केले आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणाºया आंबेडकरी अनुयायांनीहीही हे निश्चित केले आहे.
मात्र विचारांचा जागर तर व्हायलाच पाहिजे. त्यामुळे डिजीटल माध्यमांचा उपयोग करून ऑनलाईन जागर करण्यात येत आहे. तसे सोशल माध्यमांचा उदय झाल्यापासून प्रत्येक गोष्ट ऑनलाईन शेअर करणे, ही सामान्य गोष्ट झाली आहे. या माध्यमातूनच जयंती सोहळ्याला व्यापक रुप देण्याचा संस्था व संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळे काही संस्थांनी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे ऑनलाईन नियोजन केले आहे.
घरी राहून वक्तृत्व स्पर्धा, बुद्ध भीम गीते गायन स्पर्धा, चित्रकला स्पधेर्चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. काव्यवाचन आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रमांचेही ऑनलाईन आयोजन करण्यात येत आहे. मात्र जागर करताना उत्सवी रुप येणार नाही, कोरोनाशी लढणाºया आरोग्य सेवक, पोलीस यांचा सन्मान राखला जाईल, याचेही भान राखले जात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांची ही जयंती कधीही नव्हे असा अनुभव ठरेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
- बानाई व आवाज इंडियातर्फे विविध स्पर्धा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स (बानाई) आणि आवाज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष आयोजन करण्यात आले आहे. बुद्ध-भीम गीते गायन, वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आहे. घरात राहून गायनाचे व भाषणाचे व्हिडीओ तसेच निबंध व चित्रकलेचे व्हिडीओ चॅनेलला ऑनलाईन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पधेर्साठी भारताचे राष्ट्रपिता महात्मा फुले व डॉ. आंबेडकर, राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान आदी विषय देण्यात आले आहेत. यासाठी आकर्षक पुरस्कारही सहभागींना मिळणार आहेत. याशिवाय घरात बसून बुद्ध वंदना व इतर आयोजनांचे प्हिडीओ पाठविण्याचे आवाहनही बानाईतर्फे करण्यात आले आहे.
आंबेडकर नाट्य परिषदेतर्फे भाषणांची स्पर्धा
आंबेडकर नाट्य परिषदेच्या बॅनरखाली सम्यक थिएटर, फिल्म टेलिव्हिजन अँड थिएटर सोसायटी तसेच बुद्धिस्ट अकॅडमी ऑफ परफार्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भाषणांची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी व्हिडीओ फित संस्थेच्या सदस्यांचे व्हॉटसअप क्रमांक किंवा इमेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आकर्षक पुरस्कारही देण्यात येणार आहेत.
मुक्तवाहिनीतर्फे अभिवादन काव्यगाज
मुक्तवाहिनी या कविंच्या संस्थेतर्फे दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान चौक येथे अभिवादन काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे आयोजन ऑनलाईन होत आहे. यातील सहभागी कविंनी त्यांच्या काव्यवाचनाची चित्रफित प्रसेनजित गायकवाड यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन मुक्तवाहिनीचे संयोजक ताराचंद्र खांडेकर व ज्येष्ठ कवी ई. मो. नारनवरे यांनी केले आहे.