गडकरींना राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

By admin | Published: May 28, 2017 02:15 AM2017-05-28T02:15:57+5:302017-05-28T02:15:57+5:30

भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दपूर्तीनिमित्त देश-विदेशातील मान्यवरांनी शनिवारी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

Greetings to the President and the Prime Minister | गडकरींना राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

गडकरींना राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Next

देशभरातील मान्यवरांनी केले वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दपूर्तीनिमित्त देश-विदेशातील मान्यवरांनी शनिवारी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सकाळच्या सुमारास गडकरींना शुभेच्छा दिल्या व त्यांच्याशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्रिमंडळातील गडकरी यांचे सहकारी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनीदेखील गडकरींना शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री विजय गोयल, केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांच्यासह देशातील आघाडीच्या उद्योगपतींनी गडकरी यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीपासून नागपुरातील गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांची गर्दी होती. रात्री १२ वाजता आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याप्रसंगी ६१ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या गडकरी यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवसाचा केक कापला.

गडकरींनी केले चार संकल्प
६१ व्या वर्षांत पदार्पण केल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहू, असे सांगत गडकरी यांनी वाढदिवसाप्रीत्यर्थ चार संकल्प केले. यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या संपविण्यासाठी विदर्भात विविध योजना कशा आणता येतील, यासाठी प्रयत्न करणे, बद्रीनाथ-केदारनाथ चारधामचा १२ हजार कोटींचा रस्ता पूर्ण करणे, विदर्भात २० लाख लिटर दुधाची निर्मिती झाली पाहिजे यासाठी प्रकल्प आणणे. याचा पाच लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, तसेच दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या धर्तीवर उत्तराखंड येथील ओली येथे प्रकल्प तयार करणे, याचा समावेश आहे.

गडकरींनी मारली दर्डांना घट्ट मिठी
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा हे नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी नितीन गडकरी यांनी दर्डा यांना घट्ट मिठी मारली. याप्रसंगी गडकरी व दर्डा यांनी आपल्या निखळ आणि पक्षाभिनिवेष यापलीकडे असलेल्या मैत्रीच्या अनेक आठवणी जागवल्या. यावेळी सौ. कांचनताई गडकरी आणि कुटुंबीय उपस्थित होेते.

लोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दपूर्तीप्रीत्यर्थ लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘षष्ट्यब्दपूर्ती’ या विशेषांकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी गडकरी यांना हा विशेषांक भेट दिला. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, मुंबईतील प्रख्यात हिरे व्यापारी किरीट भन्साळी, विक्रीकर विभागाचे आयुक्त पराग जैन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग व लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर उपस्थित होते.

 

Web Title: Greetings to the President and the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.