पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय समितीसमोर मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:23 PM2020-09-12T21:23:19+5:302020-09-12T21:24:36+5:30
केंद्र्राकडून आलेली समिती सध्या विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असून पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहे. या चमूने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र्राकडून आलेली समिती सध्या विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असून पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहे. या चमूने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. शेताच्या नुकसानीचाही आढावा घेतला. शनिवारी ही चमू भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात होती. दौऱ्यानंतर रविवारी आयुक्त कार्यालयात आढावा बैठक होेणार आहे.
सहा सदस्यीय या समितीच्या दोन चमू करण्यात आल्या असून एका चमूने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पाहणी केली. तर दुसऱ्या चमूने नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील गावकरी आणि शेतकऱ्यांना भेटून आढावा घेतला. समितीने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा तालुक्यातील प्रभावित गावांना भेटू देऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि माहिती जाणून घेतली. तर शनिवारी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भेटी दिल्या.
शुक्रवारी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी या समितीने विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर समितीचे सदस्य महेंद्र सहारे, एस.एस.मोदी आणि आर. पी. सिंह यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह कामठी तालुक्यातील सोनेगाव गाठले. या गावामध्ये पुरामुळे १५५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ३५४ घरांपैकी ११४ घरांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी समितीसमोर पुनर्वसनाची मागणी केली. धानाचे पीक हातून गेल्याची व्यथा गजानन झोड या शेतकऱ्याने मांडली. नामदेव राऊत यांचे संपूर्ण घरच पुरात वाहून गेले. मधुकर चौधरी यांची गाय वाहून गेली. अशोक महल्ले यांच्या संपूर्ण पऱ्हाटीचे नुकसान झाले.
यानंतर समितीने निलज गावाला भेट देऊन समस्या समजून घेतल्या. जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, सरपंच सुभाष नाकाडे, उपसरपंच रवींद्र दोडके आदींनी पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप गावाच्या पुनर्वसनाची मागणी केली. इस्लामपुर माथनी गावातील नुकसानाचाही आढावा समितीने घेतला. यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय अधिकारी जोगद्र कट्यारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, पारशिवनीचे तहसीलदार वरुण सहारे, गटविकास अधिकारी बनमोटे आदी सहभागी होते.
नॉनस्टाप पहाणी
दुपारी १२.३० वाजता कामठी तालुक्यातील गावांपासूृन सुरू झालेली पहाणी रात्री ८.३० पर्यंत सुरूच होती. दौऱ्यातील अखेरचे गाव मौदा तालुक्यातील होते. येथे तर समितीने अंधारात भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आणि परिस्थिती जाणून घेतली.
विभागात ८८, ८६४ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागपूर विभागातील ३४ तालुक्यांमधील ८८ हजार ८६४ हेक्टर कृषी क्षेत्राचे पुरामुळे नुकसान झाल्याची माहिती दिली. विभागातील २३ हजार घरांची पडझड झाली असून धान, कापूस सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले.