पाच वर्षांत किराणा महागला; सामान्यांचे बजेट दुपटीने वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 09:35 PM2021-12-22T21:35:05+5:302021-12-22T21:35:37+5:30
Nagpur News भाववाढीचा आलेख पाहिल्यास २०१७ च्या तुलनेत २०२१ मध्ये किराणा आणि अन्य जीवनाश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
नागपूर : गेल्या पाच वर्षांत घरगुती सिलिंडर, खाद्यतेल, किराणा आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या असून गरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. एकाच वर्षांत सिलिंडरच्या किमतीत जवळपास ४०० रुपये आणि खाद्यतेल ५० रुपयांनी महाग झाले आहे. भाववाढीचा आलेख पाहिल्यास २०१७ च्या तुलनेत २०२१ मध्ये किराणा आणि अन्य जीवनाश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची झळ सर्वस्तरातील लोकांना सोसावी लागत आहे.
खाद्यतेलाचे दर दुप्पट
स्वयंपाकघरात अत्यावश्यक खाद्यतेलाचे दर दोन वर्षांतच दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गरीब व सामान्यांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. त्या तुलनेत सर्वसामान्यांच्या उत्पन्न वाढ झालेली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रति किलो ७५ रुपये असलेले सोयाबीन तेलाचे दर नोव्हेंबर २०२० मध्ये प्रति किलो ९५ रुपयांवर पोहोचले. यावर्षी जुलै महिन्यात १७० रुपयांवर गेले. आता १३८ रुपयांपर्यंत खाली आले आहे.
गहू व ज्वारीच्या दरात थोडी वाढ
गेल्या पाच वर्षांत गहू आणि ज्वारीच्या दरात २ ते ३ रुपये किलोने वाढ झाली आहे. तसे पाहता पाच वर्षांत धान्याची किंमत वाढलेली नाही. पण उत्तम दर्जाच्या एमपी बोट गहू आणि पांढºया ज्वारीचे दर १० रुपयांनी वाढले आहेत.
हजार लागायचे आता तीन हजारही पुरत नाहीत
पाच ते सहा वर्षांपूर्वी एक हजार रुपयांत येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंसाठी २५०० रुपयेही पुरत नाहीत. शिवाय अन्य वस्तूंच्या खरेदीचा खर्चही वाढला आहे. पेट्रोलसह घरगुती सिलिंडरही महाग झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत किराण्याचा खर्च दुप्पट झाला आहे.
सदाशिव बांगरे.
दोन हजारांचा किराणा आता चार हजारांत खरेदी करावा लागतो. त्यात खाद्यतेल, किराणा वस्तू आणि धान्य व डाळींचा समावेश आहे. शिवाय घरगुती सिलिंडरला जास्त पैसे मोजावे लागतात. एकूणच पाहता उत्पन्नाच्या तुलनेत महिन्याचा खर्च वाढला आहे.
सोमनाथ अंधारे