ग्राउंड रिपोर्ट - नागपुरातील ‘हायप्रोफाइल’ लढतीची रंगत वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:55 AM2019-04-06T07:55:36+5:302019-04-06T07:56:21+5:30
बसप, बीआरएसपी, वंचितचाही जोर। संघ परिवारासह भाजप ताकदीने मैदानात
कमलेश वानखेडे
नागपूर - भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूरच्या ‘हायप्रोफाइल’ जागेकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भंडारा- गोंदियाच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सामील झालेले नाना पटोले त्यांना आव्हान देत आहेत. बसपा, वंचित बहुजन आघाडी व बीआरएसपीनेही आपला ग्राफ वाढविण्यासाठी ताकद लावली आहे.
गडकरी प्रचारात त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर काँग्रेसचे नाना पटोले हे नेत्यांचा विकास झाल्याचे सांगत भाजपाला लक्ष्य करीत आहेत. भाजप देशहित, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत असून काँग्रेसची भिस्त सामाजिक समीकरणांवर असल्याचे दिसते. भाजपासह संघ परिवार एकदिलाने ‘गड’ सर करण्यासाठी उतरला आहे. तर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही तूर्तास दबा धरून बसली आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचा ‘मास्टरस्ट्रोक’ भाजपा मारणार आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची एखाद दुसरी सभा वगळता स्टार प्रचारक फिरकलेले नाहीत. गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सभा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
बहुजन समाज पक्षाने बाहेरचा उमेदवार देण्याची प्रथा यावेळी खंडित केली. नगरसेवक मोहम्मद जमाल यांना हत्तीवर स्वार केले. शिवाय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या शुक्रवारच्या सभेने ‘हत्ती’ धावण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे यांच्यावर डाव लावला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. असदुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात जाहीर सभा घेत प्रचाराची धुरा सांभाळली. बसपाला खिंडार पाडत ‘बीआरएसपी’ हा नवा पक्ष स्थापन करणारे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अॅड. सुरेश माने रिपब्लिकन मते खेचण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. अॅड. श्रीहरी अणे, माजी आ. अॅड. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी पक्ष व संघटनांचे बळ त्यांच्या कामी लागले आहे.
नागपूरच्या ‘मिहान’चा जुन्या मुख्यमंत्र्यांनी फक्त ‘बँडबाजा’ वाजविला. आम्ही प्रत्यक्षात स्वप्न साकार केले. अवघ्या तीन वर्षात मेट्रो धावली. आयआयएम, एम्स, एमएनएसयू, ट्रीपल आयटी, जीईसी एकापाठोपाठ झाले सुरू झाले. युवकांना रोजगार देण्याचे लक्ष्य पूर्ण केले.
- नितीन गडकरी, भाजपा
पाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. प्रकल्पाच्या नावाखाली मोक्याच्या जागा बळकावल्या. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नेमका विकास कुणाचा झाला, हाच खरा प्रश्न आहे.
-नाना पटोले, काँग्रेस
प्रमुख उमेदवार
नितीन गडकरी । भाजप
नाना पटोले । काँग्रेस
मोहम्मद जमाल । बसप
कळीचे मुद्दे
भाजपासह संघ परिवार ‘गड’ सर करण्यासाठी एकदिलाने विकासाचा अजेंडा घेऊन उतरला आहे. समाज घटकांवरही लक्ष केंद्रित आहे.
हायकमांडचा वॉच असल्याने काँग्रेसमधील गटबाजी दबा धरून बसली आहे. कार्यकर्ता पक्षाच्या यंत्रणेची वाट न पाहता राबताना दिसतो आहे.