जागेअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचार : मेयोची धक्कादायक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:07 PM2020-02-17T23:07:38+5:302020-02-17T23:09:06+5:30
मेयो प्रशासनाने वर्षभरापूर्वीच ५०० खाटांच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. परंतु वर्ष होऊनही याला मंजुरी मिळाली नाही. जागेअभावी रुग्णांवर दाटीवाटीने तर काहींवर जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ब्रिटिशकालीन इमारती धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त होताच येथील वॉर्ड दुसऱ्या इमारतीत स्थानांतरित करण्यात आले. ही स्थिती येणार म्हणून मेयो प्रशासनाने वर्षभरापूर्वीच ५०० खाटांच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. परंतु वर्ष होऊनही याला मंजुरी मिळाली नाही. जागेअभावी रुग्णांवर दाटीवाटीने तर काहींवर जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे.
मेयो रुग्णालय हे १८६२ मध्ये सिटी हॉस्पिटल या नावाने ओळखले जायचे. याची स्थापना ब्रिटिशांनी केली होती. १९६७ पासून राज्य सरकारकडे या रुग्णालयाचे नियंत्रण आले. ३८.२६ एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयात आजही ब्रिटिशकालीन इमारतीमधून आतापर्यंत रुग्णसेवा दिली जात होती. मागील वर्षी बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’साठी‘व्हीएनआयटी’ची मदत घेतली. दोन महिन्यापूर्वीच त्याचा अहवाल प्राप्त झाला. यात वॉर्ड क्र. ३,४, ७ व ८ असलेली ब्रिटिशकालीन इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद केले. याचे वास्तव ‘लोकमत’नेही मांडले. याची दखल घेत बालरोग विभागाचे वॉर्ड क्र. ७ व ८ हे दुसऱ्या इमारतीच्या वॉर्ड क्र. १ व २ मध्ये स्थानांतरित करण्यात आले. तर औषधवैद्यकशास्त्र विभागाचे (मेडिसीन) वॉर्ड क्र. ३ व ४ हे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या इमारतीमधील वॉर्ड २१ व २२ मध्ये स्थानांतरित करण्यात आले. परंतु अपुरी जागा, अपुऱ्या खाटांमुळे काही रुग्णांवर जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहे.
वर्षभरापूर्वी पाठविला होता नव्या इमारतीचा प्रस्ताव
मेयोने ५०० खाटांच्या ‘मेडिसीन ब्लॉक’ नावाच्या इमारतीसाठी गेल्या वर्षीच प्रस्ताव पाठविला होता. तीन लाख स्कवेअर फूट जागेवरील या इमारतीत मेडिसीन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अपघात विभाग, एमआयसीयू, पीआयसीयू, आयसीयू, चार शस्त्रक्रियागृह, लेबर रुम, रेडिओलॉजी विभाग प्रस्तावित आहेत. तळमजल्यासह सहा मजल्याच्या या इमारतीच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाने पूर्वी २६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने हा खर्च खूप जास्त असल्याचे सांगून, कमी खर्चाचा प्रस्ताव पाठविण्याचा सूचना केली होती. त्यानुसार एप्रिल २०१९ मध्ये एक मजला कमी करून सुमारे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही.
धोकादायक इमारतीतून वॉर्ड स्थानांतरित केले
ब्रिटिशकालीन इमारत धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या इमारतीतील वॉर्ड क्र. ३, ४, ७ व ८ दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले आहेत. नव्या ५०० खाटांच्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
डॉ. सागर पांडे
उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो