नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत १.५८ मीटरने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:02 PM2020-06-22T12:02:18+5:302020-06-22T12:04:14+5:30
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक पाण्याची गरज भासणाऱ्या औद्योगिक वसाहतीही बंद होत्या. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूवैज्ञानिक विभागाकडून करण्यात आलेल्या निरीक्षणात जिल्ह्यात भूजलाची पातळी १.५८ मीटरने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा भूजल पातळी वाढल्याची आकडेवारी विभागाने प्रसिद्ध केली आहे.
गतवर्षी जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे जलस्रोतही आटले होते. त्यामुळे शहरवासीयांना एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली व त्यामुळे जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे भूजलामध्येही पाणी मुरले. यंदा उन्हाळा फार तपला नाही आणि मान्सूनपूर्व पावसानेही लवकरच हजेरी लावली.
सोबतच संपूर्ण उन्हाळा कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गेला. त्यामुळे सर्वाधिक पाण्याची गरज भासणाऱ्या औद्योगिक वसाहतीही बंद होत्या. यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचा उपसा म्हणावा तेवढा नव्हता. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा मे महिन्यातील पाणी पातळी गेल्या पाच वर्षांतील सरासरीच्या ८.०४ मीटर इतकी होती.