नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत सरासरी ०.१३ मीटरने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:35 AM2021-03-04T11:35:07+5:302021-03-04T11:36:10+5:30
नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सरासरीहून अधिक पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे. यावर्षी जिल्ह्यातील भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.१३ मीटरने वाढल्याचे दिसून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सरासरीहून अधिक पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे. यावर्षी जिल्ह्यातील भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.१३ मीटरने वाढल्याचे दिसून आले आहे.
जानेवारीतील गेल्या पाच वर्षांतील पाणीपातळीची सरासरी ५.१३ मीटर होती. यंदा भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील एकूण १११ विहिरींचे निरीक्षण केले. विभागाकडे पाणीपातळीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात नमूद केल्यानुसार पाणीपातळीमध्ये मागील पाच वर्षांच्या जानेवारी महिन्याच्या पाणीपातळीच्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये जवळपास ०.१३ मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण पाणीपातळी सध्या ५.०० मीटर आली आहे. भूजल विभागातील भूवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार औद्योगिक किंवा सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुन्हा वापर केल्यास भूजलावर अतिरिक्त ताण पडणार नाही व नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत राहील.
यावर्षी भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत वाढली असली, तरी ती टिकविण्यासाठी जिल्हावासीयांना पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे. २०२० मध्ये झालेल्या पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जमिनीत पाणी मुरल्याने भूजल पातळीत वाढ दिसून येत आहे. याशिवाय, कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होता. त्यावेळी उद्योगधंदे, कारखाने बंद होते. यामुळे पाण्याचा उपसाही कमी होता.
पाच तालुक्यांत घट
- जिल्ह्यातील हिंगणा, कामठी, मौदा, नागपूर व उमरेड तालुक्याच्या पाणीपातळीमध्ये घट झाली आहे. तर, उर्वरित तालुक्यांमधील पातळीत अत्यल्प वाढ झाली आहे.